Chhatrapati Sambhajinagar Crime: आई होण्यासाठी मला मदत करा आणि 25 लाख रुपये मिळवा, असे मेसेज पाठवून सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी फ्रॉड केला जातोय. या जाळ्यात छत्रपती संभाजीनगरमधील अनेक तरुण अडकले असून यांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये 6 प्रकार उघडकीस आले आहेत. तुम्हालाही असे मेसेज येत असतील तर आताच सावध व्हा. नेमका कसा केला जातोय हा फ्रॉड? नेमके काय मेसेज येतात? पाहुयात संपूर्ण प्रकरण.

Continues below advertisement

Crime News: "मी आई झाले तर तुम्हाला 25 लाख रुपये देईन"

मी आई व्हावं यासाठी तुमची मदत हवी आहे, जर तुमच्याकडून मी आई झाले तर तुम्हाला 25 लाख रुपये देईन, असा मोबाईल आणि सोशल मीडियावर मेसेज पाठवून अनेक तरुणांना लुटल्याचे समोर आलंय. भावनिक, शारीरिक संबंध आणि पैशाचे आमिष याला वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुण बळी पडले आहेत. नोकरदार, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुले अशा फसव्या जाहिरातीला बळी पडत आहेत. छत्रपती संभाजी नगरात गेल्या काही दिवसांमध्ये 6 प्रकार उघडकीस आले आहेत.

Continues below advertisement

तरुणांना आणि ज्यांच्याकडे पैसा आहे अशांना सोशल मीडिया वरच्या वेगवेगळ्या पोस्टने भुरळ पाडली जातेय. सुंदर महिलांचे फोटो अपलोड त्यांची श्रीमंत महिला म्हणून प्रोफाइल तयार केली जाते. त्यात खूप दिवसांपासून अपत्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गर्भधारणा होत नाही. त्यामुळे मला आई बनायचे आहे,' असा मेसेज तयार करून तरुणांना जाळ्यात ओढले जाते. त्यानंतर तरुणांना निवडीच्या नावाखाली अंगप्रदर्शन करायला लावतात. समोरच्या व्यक्ती व्हिडिओवरून छायाचित्रे काढतात. न त्याचबरोबर या सर्व प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाते. व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्याचा व पैसे उकळण्याचा प्रकार सुरू होतो. त्यातून मोठ्या रकमा उकलल्या जातात. 

कशी केली जातेय फसवणूक ?

सर्वप्रथम व्यक्तीची फेसबुक प्रोफाइल तपासली जाते. त्यावरून तुमच्या जवळचे नातेवाईक, सहकारी शोधले जातात. यांच्या फोटोचे स्क्रीनशॉट आणि रेकॉर्डिंग केलेला व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठवला जातो आणि व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. पैसे दिले नाही तर तुमच्या सहकाऱ्याला किंवा मित्राला हा व्हिडिओ पाठवला जातो. त्याचे स्क्रीनशॉट पुन्हा व्हॉट्सअॅपवर पाठवतात. या टप्प्यावर समाजात आपली बदनामी होईल या भीतीने फसलेला तरुण पैसे देण्यास भाग पडतो आणि येथून पैसे उकळण्यास सुरुवात होते.

पुरुष गळाला लागला की सर्वप्रथम कॉन्ट्रॅक्ट तयार करायचे आहे, असे सांगून रजिस्ट्रेशन फी / करारपत्राचे शुल्क मागतात. मेल आयडी व्हीआयपी डेटाबेसमध्ये टाकावी लागेल, असा बहाणा करून ओळख व्हेरिफिकेशन फी घेतली जाते. कर भरावा लागेल, तेव्हाच पेमेंट रिलीज होईल, असे सांगत जीएसटी/प्रोसेसिंग चार्ज सुरक्षिततेसाठी हमी रक्कम आवश्यक असल्याचे सांगून सिक्युरिटी डिपॉझिटही घेतले जाते. शेवटच्या टप्प्यात कायदेशीर प्रक्रिया आणि गोपनीयता करारासाठी लीगल टीम आणि वकिलांचे शुल्क मागितले जाते.