नाशिक : हेल्मेटसक्तीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांवर करावाई करण्यात सर्व पोलीस दल दंग असताना नाशिक शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. पाच दिवसात शहरात तब्बल तीन खूनाच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी सकाळी भाजप पदाधिकाऱ्याचा खुनाची घटना घडली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर संशयाची सुई आहे. भाजपने नाशिक बंदचा इशारा दिला आहे.
21 नोव्हेंबरला रात्री आठ साडेआठच्या सुमारास पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा सराईत गुन्हेगार प्रवीण काकड याचा म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्चस्वाच्या वादातून खून झाला. 23 नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास घराच्या अंगणात खेळत असणाऱ्या चार वर्षीय अवनी पगारेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गळ्यातील सोनसाखळी चोरण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्यावर प्रतिकार करण्याऱ्या चिमुरडीवर धारदार शास्त्राने वार करण्यात आले. त्याच रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजेश शिंदे या भाजी विक्रेत्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.
या सर्व घटना ताज्या असतानाच आज सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास अमोल इघे या भाजपच्या सातपूर मंडल अध्यक्षाची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. कामगार युनियनच्या वादातून हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्या करणारा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संलग्न महाराष्ट्र वंचित कामगार संघटनाचा अध्यक्ष विनायक बर्वे असल्याचा आरोप भाजपने केला आहे. शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ आणि पोलीस आयुक्त दीपक पांडे गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप भाजपने केला असून पालकमंत्री आणि पोलीस आयुक्त हटविण्याची मागणी भाजपने केली आहे.
भाजप कामगार मोर्चा संलग्न महाराष्ट्र राज्य कामगार संघ याच संघटनेचे काम अमोल इघे आणि विनायक बर्वे करत होते. मात्र दोघांमध्ये वाद होत असल्याने आधीच जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करण्यासारखे गुन्हे दाखल असणाऱ्या विनायक बर्वे याने भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाल्यानंतर भाजपच्या कामगार युनियनच्या फलकाशेजारीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संलग्न महाराष्ट्र वंचित कामगार संघटनेचा बोर्ड लावला. त्याचे उद्घाटन माजी खासदार पालकमंत्रीचे पुतणे समीर भुजबळ यांच्या हस्ते केले. वर्चस्वाची लढाई आज खुनापर्यंत येऊन पोहचली आहे. संशयित आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.
खून प्रकरणातील संशयित आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसशी सबंधित असल्यानं राष्ट्रवादीचे पदाधिकारी अडचणीत आले आहेत. त्यातच भाजपने पालकमंत्री हटविण्याची मागणी केल्यानं छगन भुजबळ यांनी भाजपाला हटविण्याची गरज असल्याचा टोला लगावत गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्तांना सूचना करणार आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :