Crime News : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने इचलकरंजी येथील मंगळवार पेठेतील एका घरावर छापा टाकून बनावट नोटा छापण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी 2 लाख 24 हजार 200 रुपयांच्या बनावट नोटा आणि 70 हजार 700 रुपयांचे छपाईसाठी वापरलेले साहित्य असा एकूण 2 लाख 94 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. अनिकेत विजय शिंदे (२४), राज रमेश सनदी (१९) आणि सोएब अमजद कलावंत (१९, तिघेही रा. इचलकरंजी) अशी आरोपींची नावे असून त्यांनी युट्यूबवरील माहितीच्या आधारे बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला होता.
सापळा रचून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस संतोष बरगे आणि प्रदीप पाटील यांना नारायण टॉकीज परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अनिकेत शिंदे याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्याकडून बनावट नोटा आढळून आल्या.
चौकशीत त्याने बनावट नोटा स्वतःच्या घरी छापत असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकत त्याच्या सहकाऱ्यांना अटक केली. आरोपींनी कमी वेळ आणि श्रमात अधिक पैसा मिळवण्याच्या उद्देशाने हा मार्ग अवलंबल्याचे तपासात उघड झाले आहे.
युट्यूबवरून शिकले बनावट नोटा छापणे
आरोपींनी युट्यूबवरील व्हिडिओ पाहून नोटा छपाईचा संपूर्ण प्रकार शिकल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी कार्डशिटवर नोटेची प्रत चिकटवून ती स्कॅन करून प्रिंट काढण्याची पद्धत वापरली. यासाठी लागणारे प्रिंटर, स्कॅनर, पेपर आदी साहित्य त्यांनी स्वतंत्रपणे गोळा केले होते.
रॅकेट असल्याचा संशय
गेल्या काही दिवसांपूर्वी गडहिंग्लज शहरातही बनावट नोटा प्रकरण उघडकीस आले होते. आता इचलकरंजीत छापखाना उघडकीस आल्यानंतर या बनावट नोटा छपाईसाठी कार्यरत असलेल्या संघटित रॅकेटचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या