अहमदनगर : साई पालखीत (Saibaba Palkhi ) गोळीबार (Firing) झाल्याची माहिती समोर आली आहे. शिर्डी जवळील सावळीविहीर येथे ही घटना घडली आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. खांद्याला गोळी लागल्याने जखमी झालेल्या व्यक्तीला तात्काळ रूग्णालयात  दाखल करण्यात आले आहे. विकी भांगे ( वय, 30 रा.पुसद, यवतमाळ) असे गोळीबार करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. तर निलेश सुधाकर पवार ( वय,  27 पुसद हल्ली मुक्काम, गोरेगाव मुंबई) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 


मुंबईतील गोरेगाव येथून साईंची पालखी शिर्डीकडे निघाली होती. याच पालखीत विकी भांगे आणि सुधाकर पवार सहभागी झाले होते. मागिल राग मनात धरून भांगे याने पालखी शिर्डीत पोहोचल्यानंतर पवार याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात निलेश पवार हा जखमी झाला असून त्याच्यावर शिर्डीतील साईबाबा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबार करणाऱ्या भांगे या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


Crime News : वैयक्तिक कारणातून गोळीबार


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वैयक्तिक कारणातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी मिळाली आहे. जखमी निलेश याने गोळीबार करणाऱ्या तरुणाच्या बहिणीसोबत दोन वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केले होते. याचाचा राग असल्याने गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, या घटनेने शिर्डी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.  


नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातील विविध ठिकाणाच्या पालख्या शिर्डीमध्ये दाखल होत आहेत. मुंबईच्या गोरेगाव येथील आलेल्या द्वारकामाई पालखीमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास पुसद येथील एका तरुणाने पालखीमध्ये आलेल्या साईभक्त तरुणावर गोळीबार केला. भरदिवसा पालखीतील तरुणावर गोळीबार झाल्याने शिर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


Crime News : गावठी कट्ट्यासह आरोपी पोलिसांच्या ताब्यात


आज दुपारच्या सुमारास गोरेगाव येथील द्वारकामाई पालखी शिर्डीजवळील सावळीविहीर येथे नाष्ट्यासाठी थांबली होती. त्या पालखीतील निलेश पवार हा तरूण नाष्टा वाटत होता. तेव्हा आरोपीने त्याच्यावर दोन राऊंड फायर केले. जखमी निलेश पवार आणि आरोपी दोघेही राहणार पुसद जिल्हा यवतमाळचे असून जखमी पवार हा सध्या गोरेगाव येथे राहातोय. मुंबईहून पालखीत चालत येत असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आलाय. या प्रकरणी गावठी कट्ट्यासह आरोपीला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून शिर्डी पोलिस अधिक तपास करत आहेत.  


महत्वाच्या बातम्या


वांद्रे येथील माऊंट मेरी चर्चवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्ट