Shobha Bachhav: 'माझ्या खात्यात 62 हजार रुपये जमा करा, मी दोन तासांत परत करेन', काँग्रेस खासदाराचा मोबाईल हॅक झाला अन्...; नेमकं काय घडलं?
Shobha Bachhav: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Shobha Bachhav: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव (Dr. Shobha Bachhav) यांचा मोबाईल हॅक (Mobile Hacked) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईल हॅक झाल्यानंतर खासदारांच्या फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्टमधील अनेक व्यक्तींना व्हॉट्सॲपवरून (WhatsApp) पैसे पाठविण्याची मागणी करणारे मेसेज पाठवण्यात आले. काहींना ‘माझ्या खात्यात 62 हजार रुपये जमा करा, मी दोन तासांत परत करेन’, असा मेसेज पाठवण्यात आला. तर काहींना ‘Help Me’ असे संदेश आल्याने संबंधित व्यक्तींमध्ये एकच खळबळ उडाली.
Shobha Bachhav: कुरिअरच्या नावाखाली आलेल्या फोननंतर मोबाईल हॅक
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल त्यांच्याकडे नसून त्यांचा पीएकडे होता. त्याचवेळी एका व्यक्तीचा फोन आला. ‘तुमचे कुरिअर आले आहे, मात्र पत्ता सापडत नाही. तुम्हाला एक लिंक पाठवली आहे, ती तपासा,’ असे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितल्याचे समोर आले आहे. यानंतर संबंधित लिंक उघडल्यानंतर काही वेळातच खासदारांचा मोबाईल हॅक झाल्याचा प्रकार समोर आला. मोबाईल हॅक झाल्यानंतर सायबर फसवणूक करणाऱ्यांनी खासदारांच्या नावाने त्यांच्या संपर्कातील अनेक व्यक्तींना मेसेज पाठवून पैशांची मागणी सुरू केली.
Shobha Bachhav: ‘62 हजार रुपये पाठवा, दोन तासांत परत करेन’
हॅक झालेल्या मोबाईलवरून काही व्यक्तींना 62 हजार रुपये पाठवण्याची मागणी करण्यात आली. ‘माझ्या खात्यात 62 हजार रुपये जमा करा, मी दोन तासांत परत करेन,’ असा संदेश अनेकांना पाठवण्यात आल्याची माहिती आहे. यानंतर डॉ. शोभा बच्छाव यांना आपला मोबाईल हॅक झाल्याचा प्रकार लक्षात आला.
Shobha Bachhav: तातडीने सायबर पोलिसांत तक्रार
मोबाईल हॅक झाल्याचे समजताच खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तांत्रिक तपास सुरू केला. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल पुन्हा सुरक्षित करण्यात सायबर पोलिसांना यश आल्याची माहिती समोर आली आहे.
Shobha Bachhav: नागरिकांनी सावध राहण्याची गरज
या घटनेमुळे पुन्हा एकदा सायबर फसवणुकीचा धोका अधोरेखित झाला आहे. कुरिअर, बँक, सरकारी संस्था किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने येणारे संशयास्पद फोन, मेसेज किंवा लिंक याबाबत नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. खासदारांच्या मोबाईलमधूनच त्यांच्या परिचितांना पैसे मागणारे मेसेज गेल्याने अनेकांची दिशाभूल होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, वेळीच काही व्यक्तींनी खासदारांशी संपर्क साधल्याने हा प्रकार उघडकीस आला आणि सायबर पोलिसांनी हस्तक्षेप करत मोबाईल सुरक्षित केला. या प्रकरणात मोबाईल हॅक करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा






















