मुंबई: बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संस्थाचालक आणि पोलिसांकडून हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी पीडित मुलींच्या पालकांची तक्रार नोंदवून घ्यायला 12 तास लावले. त्यामुळे पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले होते. या संतप्त नागरिकांनी मंगळवारी सकाळी हजारोंच्या संख्येने शाळेवर मोर्चा काढला होता. त्यानंतर नागरिकांनी बदलापूरमध्ये रेल्वे ट्रॅकवर उतरत मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली होती. नागरिकांच्या या संतप्त प्रतिसादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
मी पोलीस आयुक्तांशी स्वत: बोललो, त्या आरोपीला अटक झाली आहे, जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा होईल, पोक्सो अंतर्गत कलमं लावायला सांगितलं आहे, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल, आरोपीला कठोर शिक्षा होईल. या खटल्यास विशेष पीपी नेमण्यास सांगितलं आहे. संस्था चालकांचीही चौकशी करुन जे दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करु. पोलिसांनी आरोपींना अरेस्ट केलं आहे, पोलिसांना अटेम्पट टू रेप हा खटला दाखल करायला सांगितलं आहे.. संस्थाचलकांनीही कर्मचारी ठेवताना बॅकग्राऊंड तपासलं पाहिजे, जर तसं झालं नसेल तर त्यांच्यावरही कारवाई होईल.अत्यंत कठोर कारवाई करु, पोलीस, गृह विभाग आणि सरकार पूर्ण कठोर कारवाई करण्याच्या बाजूने असतील. कोणी पोलीस असतील जे यात दोषी आढळले तर त्यांनाही सोडणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पोलिसांनी तक्रार दाखल न करुन घेतल्याने नागरिक संतापले: शंभुराज देसाई
या प्रकरणाबाबत ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, ही दुर्दैवी घटना आहे. याबाबत चौकशी करण्याचे आदेश पोलीस ठाण्याला दिले आहेत. ज्या संस्थेची शाळा आाहे, व्यवस्थापन आहे, मुख्याधापक असेल त्यांनी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष का केलं, याची शिक्षण विभागामार्फत चौकशी करा असं सांगितलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेणयास उशीर केल्याने लोकांचा संयम सुटला, अशी माहिती मला मिळाली. हा प्रकार घडला तेव्हा पोलीस ठाण्यात कोण प्रभारी होते,कोणाची ड्युटी होती, याचा अहवाल पोलीस उपायुक्तांना दोन दिवसांत सादर करण्याचे अहवाल देण्यात आले आहेत. याप्रकरणात पोलीस दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.
आणखी वाचा