Chhattisgarh Naxal : छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये तीन दिवसापासून नक्षलविरोधी अभियान सुरू आहे. या अभियानाला आता यश येताना दिसत आहे. नक्षल्यांचा तळ असलेल्या इंद्रावती नॅशनल पार्क जवळ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये तूफान चकमक झाली असून या चकमकीत जहाल नक्षलवादी भास्कर सह 24 तासात तीन नक्षलवादी ठार (Naxal Encounter) झाल्याची माहिती समोर आली आहे. काल (6 जून) सकाळी झालेल्या चकमकीत 50 लाख रुपये बक्षीस असलेला तेलंगाना राज्य समितीचा पदाधिकारी असलेला जहाल नक्षलवादी भास्कर ठार झाला आहे. रात्री उशिरा त्याची ओळख पटली असून आज  (7 जून) सकाळपासून चकमक सुरू आहे. त्यात आणखी दोन नक्षलवादी ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. 

Continues below advertisement


24 तासात तीन नक्षलवादी ठार, अत्याधुनिक शस्त्रही सापडलं


दरम्यान, पुढे आलेल्या माहितीनुसार घटनास्थळावर ऑटोमॅटिक रायफल आढळून आले असून आणखी काही नक्षली ठार झाले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एककडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागाचा दौरा करत आहेत. ते महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम कवंडे गावात पोहोचले, या भागात भेट देणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले. या दौऱ्यात कोट्यवधींचा इनाम असलेल्या 12 नक्षलवाद्यांनी अत्याधुनिक शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. या आत्मसमर्पित माजी नक्षल्यांच्या 13 जोडप्यांचा सामूहिक विवाहसोहळाही गडचिरोलीत पार पडला, ज्याला उपस्थित राहून मुख्यमंत्री यांनी नवदाम्‍पत्यांना शुभेच्छा दिल्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सामावून घेण्याचा संदेश दिला.


दीड वर्षांत 28 माओवादी ठार, 31 अटक व 44 आत्मसमर्पण


मुख्यमंत्री यांच्या कवंडे आऊटपोस्टच्या दौऱ्यात, त्यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधला. अवघ्या 24 तासांत उभा राहिलेला हा पोलिस आऊटपोस्ट म्हणजे शासन-प्रशासन जनतेच्या दारात नेणारा महत्त्वाचा टप्पा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या दोन वर्षांत राज्यात 6 नवे आऊटपोस्ट उभारले गेले असून, गेल्या दीड वर्षांत 28 माओवादी ठार, 31 अटक व 44 आत्मसमर्पण असा लक्षणीय बदल घडला आहे.  मुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘धरती आबा’ अभियानांतर्गत कवंडे, नेलगुंडा व पेनगुंडा येथे आयोजित शिबिरांमधून एकूण 533 लाभार्थ्यांना विविध योजनांचे 987 लाभ प्रदान करण्यात आले. यामध्ये आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, अन्न सुरक्षा योजना, पीएम किसान सन्मान निधी, मनरेगा जॉब कार्ड, स्क्रिनिंग व अ‍ॅनिमिया तपासणी, आधार अद्ययावत करणे, जात प्रमाणपत्र आदींचा समावेश होता.


इतर महत्वाच्या बातम्या