छत्तीसगड: कोरची तालुक्यातील अंतरगाव येथे एका नवविवाहितेचा घरात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. पाणी भरून घेऊन जाताना पडल्यानंतर घरातील सोफ्याचा लाकडी कोना लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचा बनाव तिच्या पतीनेच रचल्याची माहिती समोर आली आहे. विवाहितेच्या मृत्यूच्या पाचव्या दिवशी या घटनेमध्ये नवा टिस्ट समोर आला आहे. पतिच्या मोबाइलमध्ये प्रेयसीचे फोटो पाहिल्याने पत्नीने जाब विचारला, दोघांमध्ये त्यावरून किरकोळ वाद झाले. तेव्हा प्रेमात अडथळा ठरत असल्याने पतीने गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले. 5 एप्रिलला पोलिसांनी पतीला जेरबंद केले. याच नराधम पतीने पाच वर्षापूर्वी आधीच्या प्रेयसीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. मात्र, जामिनावर सुटल्यावर त्याने दुसरीशी लग्न करून त्याने तिसरीशी घरोबा केला. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रदीप बालसिंग हारामी (३२, रा. अंतरगाव, ता. कोरची), असे आरोपीचे नाव आहे. चमेली प्रदीप हारामी (२१), असे मृत पत्नीचे नाव आहे. प्रदीपच्या घरी आई-वडील व बहीण आहे.

मोबाइलमध्ये प्रेयसीचा फोटो पाहिला अन् वाद...

1 एप्रिलला सकाळी प्रदीपचे आई-वडील व बहीण मोहफूल वेचण्यासाठी शेतामध्ये गेले होते. तर घरी प्रदीप व चमेली हे दोघे नवरा, बायको होते. चमेलीने पतीच्या मोबाइलमध्ये त्याच्या प्रेयसीचे फोटो पाहिले व याबाबत त्यास विचारणा केली, त्यावरून दोघांत किरकोळ वाद झाला. यानंतर प्रेमप्रकरणात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा गळा दाबून प्रदीपने लिचा जीव घेतला. व पाणी वाहून नेताना घसरून पडल्यानंतर सोफ्याचा कोना लागण्याचा बनाव रचला. त्यानंतर झोपडी बनवण्यासाठी लाकडे गोळा करण्याचे निमित्त करून तो घरातून बाहेर पडला.

प्रेयसीचं प्रकरण माहिती न होऊ देता केले लग्न

वर्षभरापूर्वी प्रदीप हारामी याने मूळच्या मूरपार (ता. दवंडी, जि. बालोद, छत्तीसगड) येथील चमेली या तरुणीशी लग्न केलं होतं. शेतीव्यवसाय करणाऱ्या प्रदीपच्या आयुष्यात यापूर्वी एक प्रेयसी आली होती. ती शिक्षणासाठी पुण्याला राहायची. 2018 मध्ये ती गावी आली. तिने लग्नासाठी तगादा लावला. त्यावेळी त्याने तिला दुचाकीवरून कुरखेडाच्या तळेगाव जंगलात नेलं आणि बलात्कार केला व नंतर तिची ब्लेडने गळा चिरून हत्या केली होती.

या प्रकरणात कुरखेडा पोलिसांनी त्यास जेरबंद केले होते. पाच वर्षे कारागृहात राहिल्यानंतर तो 3 वर्षभरापूर्वी जामिनावर बाहेर आला. त्याने आधीचे गुन्हे आणि कृत्य लपवून चमेलीशी संसार थाटला. प्रेयसीच्या खुनाबद्दल नंतर माहिती झाली. मात्र, चमेलीने त्यास स्वीकारले आणि तिचीच घात झाला. त्यानंतर त्याचे एका विवाहितेशी प्रेमप्रकरण सुरू झाले. या प्रेमप्रकरणामुळे त्या तरुणीने लग्नानंतर चार महिन्यांतच पतीशी काडीमोड घेतला होता. 

शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्काराची केली घाई

प्रदीपची बहीण शेतातून घरी परतली तेव्हा चमेली घरात मृतावस्थेत आढळली. तिने प्रदीपला फोन करून माहिती दिल्यावर तो धावत आला व कोटगुलला एका खासगी दवाखान्यात नेले, त्यानंतर तो तिच्या अंत्यसंस्काराची घाई करू लागला; पण माहेरच्या मंडळींनी उत्तरीय तपासणीची मागणी केली. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून खून केल्याचे समोर आले.