Chhatrapati Sambhajinagar: 'बघून घेतो' म्हणत पोलिसावर हात उचलला, मद्यधुंद पतीने पत्नीला बोलावलं, शिवीगाळ करत रस्त्यावर धिंगाणा, संभाजीनगरमध्ये घडलं काय?
वाद वाढताच सोमनाथने “तुम्हाला दोन दिवसांत बघून घेतो” अशी धमकी देत संतोष खरात यांच्या अंगावर हात उचलला.

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये गाड्या चालवण्याची शिस्त नसणे हे काही नवीन नाही. सिग्नल तोडून पळ काढणाऱ्यांची संख्याही कमी नाही. पण आता संभाजीनगरमध्ये एका ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याला एका दारुड्याने शिवीगाळ करीत वर्दीवर हात उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. ड्युटीवर असणाऱ्या पोलिसाला शिवीगाळ करत मद्यधुंद दुचाकी चालकाने कानशिलात लगावल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. त्याने पत्नीलाही घटनास्थळी बोलवून अक्षरशः धिंगाणा घातला. शिवीगाळ करत तुला दोन दिवसात बघून घेतो असे म्हणत पोलिसाच्या अंगावर हात उचलला. रस्त्यावर जाऊन झोपला. या सगळ्या प्रकारानंतर पती-पत्नीच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सोमनाथ मुरलीधर गिरी असे गुन्हा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.(Crime news)
ट्रॅफिक पोलिस कर्मचारी संतोष खरात हे हायकोर्ट सिग्नलवर ड्युटी करीत होते. त्यावेळी दुचाकीस्वार सोमनाथ हा डिव्हायडर जवळून गाडी चालवत होता. त्यास थांबवल्यावर तो दारू पिल्याचे आढळले. चौकशी सुरू केल्याने त्याने हुज्जत घालत शिवीगाळ सुरू केली.
नेमके घडले काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष खरात हे हायकोर्ट सिग्नल परिसरात वाहतूक नियमनासाठी ड्युटीवर होते. यावेळी सोमनाथ गिरी हा दुचाकीने डिव्हायडरजवळून वाहन चालवत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने खरात यांनी त्याला थांबवून चौकशी केली. तपासणीदरम्यान तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे उघड झाले. यानंतर सोमनाथने पोलिसांशी हुज्जत घालत शिवीगाळ सुरू केली.
बघून घेतो म्हणत धमकावले, पोलिसाला चापट मारली
वाद वाढताच सोमनाथने “तुम्हाला दोन दिवसांत बघून घेतो” अशी धमकी देत संतोष खरात यांच्या अंगावर हात उचलला. इतक्यावर न थांबता त्याने आपल्या पत्नीला घटनास्थळी बोलावून घेतले. पत्नी आल्यानंतर दोघांनी मिळून पोलिस कर्मचाऱ्याशी जोरदार वाद घालत शिवीगाळ केली आणि लोटालोट करत फिर्यादीला चापट मारल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, सोमनाथ हा रस्त्यावर जाऊन झोपल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिस आणि दामिनी पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीही पती-पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला.शेवटी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आणले. या प्रकरणी संबंधित पती-पत्नीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

























