Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमधील एका नामांकित इंग्रजी शाळेमध्ये चार मुलांनी त्यांच्याच वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे सर्व विद्यार्थी सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये ही घटना घडल्याची माहिती पीडित मुलाच्या पालकांनी दिली. याप्रकरणी 4 मुलांविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी सुरू केली. दुसरीकडे, शाळेने मात्र संबंधित मुलांवर कोणतीही कारवाई केली नाही. उलट पालकांवरच दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे. 

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगरच्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडलेला हा धक्कादायक प्रकार जेव्हा एबीपी माझानं समोर आणला तेव्हा अख्खा महाराष्ट्र हादरला. पीडित विद्यार्थी हा सहावीतला आहे आणि त्याच्याच वर्गातल्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्याच्यासोबत हे दुष्कृत्य केलं आहे. 

त्रिस्तरीय समितीकडून चौकशी

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी सुरू केली. मात्र शाळेकडून संबंधित मुलांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित मुलाच्या वडिलांनी केला. उलट पीडित मुलावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित मुलाच्या वडिलांनी केला. 

Continues below advertisement

राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसेंनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. दादा भुसे म्हणाले की, या संदर्भात मी स्वत: माहिती घेणार आहे आणि त्यावर योग्य ती करेन. शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.

संगतीमुळे मुलं बिघडतात

पण शाळकरी मुलांमध्ये अशा प्रकारची विकृत मानसिकता येते कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर मानसोपचार तज्ज्ञ किशोर शितोळे यांनी सांगितलं की, "मोबाईलचा अतिवापर, पॉर्न व्हिडीओ पाहणे, एका विशिष्ट विचारसरणीच्या मुलांच्या एकत्र ग्रुप होणे, अशा कारणामुळे या घटना घडू शकतात. यावर उपाय म्हणजे पालकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे."

सध्य़ा आरोप असलेल्या चार अल्पवयीन मुलांवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेत घडणारे असे प्रकार भविष्यात थांबावेत यासाठी शाळा प्रशासन, शिक्षण विभाग काय कारवाई करणार हे पाहावं लागेल.

ही बातमी वाचा: