Chhatrapati Sambhajinagar FDA Raid: हॉटेलमध्ये जाऊन चमचमीत आणि चवदार जेवणाचा आस्वाद घेणाऱ्या खवय्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि डोळे उघडणारी बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या संपूर्ण राज्यात "सेफ फूड, सेफ महाराष्ट्र" ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरातील अत्यंत लोकप्रिय आणि नामांकित असलेल्या 'यल्ला यल्ला रेस्टॉरंट' आणि 'आईच्या गावात' या दोन मोठ्या हॉटेल्सवर एफडीएच्या पथकाने धडक छापे (Raid) टाकले. या तपासणीत किचेनमध्ये रासायनिक रंगांचा बेसुमार वापर, बुरशी आलेले अन्नपदार्थ आणि ग्राहकांची उघड फसवणूक होत असल्याचे रंगेहाथ पकडण्यात आले. या गंभीर त्रुटींमुळे दोन्ही हॉटेल्सचे अन्न परवाने पुढील आदेशापर्यंत तातडीने निलंबित करण्यात आले आहेत.

Continues below advertisement

Chhatrapati Sambhajinagar FDA Raid: 'यल्ला यल्ला रेस्टॉरंट'मध्ये केमिकल रंगांची उधळण

विद्या नगर येथील प्रसिद्ध 'यल्ला यल्ला रेस्टॉरंट'च्या किचेनची तपासणी केली असता तेथे ग्राहकांच्या आरोग्याशी भयानक खेळ सुरू असल्याचे आढळले. हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आवडीचे बटर चिकन, कबाब आणि चिकन लॉलिपॉप आकर्षक दिसावेत म्हणून त्यांच्या ग्रेव्हीत मोठ्या प्रमाणावर हानिकारक अशा 'सिंथेटिक फूड कलरचा' बेसुमार वापर केला जात होता. एफडीएच्या पथकाने कारवाई करत जागेवरच तब्बल 20 ते 25 रासायनिक रंगांचे डबे जप्त करून ते नष्ट केले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar FDA Raid: 'आईच्या गावात' रेस्टॉरंटमध्ये बुरशीयुक्त अन्न आणि फसवणूक

दुसरीकडे, ईतखेडा-कांचनवाडी परिसरातील लोकप्रिय ठरलेल्या 'आईच्या गावात' रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची सर्रास आर्थिक फसवणूक केली जात होती. मेनुकार्डवर महागडे 'बटर नान' असे लिहून प्रत्यक्षात ग्राहकांना स्वस्त दर्जाचे 'वेजिटेबल फॅट स्प्रेड' लावून दिले जात होते. एवढेच नव्हे तर, रस काढण्यासाठी हॉटेलच्या स्टोअर रूममध्ये चक्क बुरशी लागलेले आंबे आणि सडलेल्या पालेभाज्या साठवून ठेवल्याचे पथकाला मिळून आले, ज्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकत होता.

Continues below advertisement

Chhatrapati Sambhajinagar FDA Raid: अन्न सुरक्षा कायदे मोडल्याप्रकरणी कारवाई

अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाचे उघडपणे उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएचे अधिकारी व. ता. रोडे, कि. ल. झाडे आणि सहाय्यक आयुक्त द. वि. पाटील यांच्या पथकाने ही कडक कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या धडक कारवाईमुळे हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही छोट्या-मोठ्या हॉटेल्सची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई