Chhatrapati Sambhajinagar Crime : समलैंगिकांसाठी असलेल्या डेटिंग ॲपवर (Gay Dating App) बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांना लुटणारी टोळी सध्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. गेल्या नऊ महिन्यांत या टोळीने 10 हून अधिक तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून लुटले आहे. मात्र दौलताबादमधील एका तरुणाने धाडस करून पोलिसांकडे (Police) तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकाराचा पर्दाफाश झालाय. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत वडगाव कोल्हाटी परिसरातून तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दौलताबादमध्ये हॉटेल व्यवसाय करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला 16 मे रोजी फेसबुकवर समलैंगिक डेटिंगसाठीच्या 'वॉल ॲप'ची जाहिरात दिसली. त्याने ॲप इन्स्टॉल केल्यावर एका प्रोफाइलधारकाकडून मेसेज आला. त्या व्यक्तीने आपण शहरातीलच असल्याचे सांगितल्यावर दुपारी भेटण्याचे ठरले. दुपारी 2 वाजता तीसगाव फाट्यावर ते दोघे भेटले. तेथून त्या व्यक्तीने पीडित तरुणाला करोडी टोलनाका परिसरात नेले. काही वेळात त्याचे दोन साथीदार तेथे आले आणि त्यांनी तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी तरुणाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीत करत, तू समलैंगिक असल्याचे व्हायरल करतो, असे धमकावले.
लुटमार करून पलायन
तरुणाने अनेकदा विनवण्या केल्या, मात्र आरोपी टोळीने त्याच्याकडून पैशांची मागणी केली. त्यासाठी त्यांनी त्याला कुटुंबीयांना अपघात झाल्याचे कारण सांगून पैसे मागण्यास भाग पाडले. तरुणाच्या आईने तीन हजार रुपये पाठवले, तेव्हा आरोपींनी जवळच्या पेट्रोल पंपावरून ती रोख रक्कम काढून घेत पलायन केले.
तीन आरोपी जेरबंद
या घटनेनंतर पीडित तरुणाने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक रेखा लोंढे आणि उपनिरीक्षक कृष्णा घायाळ यांना तपासाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर आरोपींच्या दुचाकीच्या वर्णनाच्या आधारे शोधमोहीम सुरू करण्यात आली. तपासात दुचाकी वडगाव कोल्हाटी परिसरातील असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, सहायक फौजदार पाटेकर आणि अंमलदार कैलास जाधव, महेश घुगे, ज्ञानेश्वर कोळी, अविनाश बरवंट यांच्या पथकाने संबंधित परिसरात जाऊन शोध घेतला आणि अखेर आरोपींच्या घरावर धाड टाकून राहुल राजू खांडेकर (20), आयुष संजय लाटे (21) आणि शिवम सुरेश पवार (24, तिघेही रा. वडगाव कोल्हाटी) यांना अटक केली आहे.
आणखी वाचा