छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावर घडलेल्या दुर्दैवी घटनेत अख्ख्या चांदगुडे कुटुंबाचा क्षणात शेवट झाला. आई, वडील आणि मुलाच्या मृत्यूमुळे (Chhatrapati Sambhajinagar News) संपूर्ण परिसर हादरला असतानाच, आता या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. मृत कुणालची आई संगीता चांदगुडे यांचे जुने यूट्यूब व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले असून, त्यातून त्यांच्या घरातील तीव्र कौटुंबिक कलह आणि अंतर्गत वाद थेट चव्हाट्यावर आले आहेत.(Chhatrapati Sambhajinagar News)
Chhatrapati Sambhajinagar News: "माझ्या मुलाचं शिक्षण बंद होईल असं वाटलं का?"
समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये संगीता यांनी आपल्या नणंदेला उद्देशून अत्यंत आक्रमक शब्दांत सुनावले आहे. "तुला काय वाटतं, नवरा-बायकोचं भांडण करून दिलं, भावाला घरी बोलवून घेतलं म्हणजे माझ्या मुलाचं शिक्षण बंद होईल? माझे हाल होतील... मग मी तुम्हाला फोन करेल, मी तुमच्या पाया पडेल... असं होत नसतं गं! तुझं स्वप्न स्वप्नच राहणारे... बघत राहा स्वप्न, स्वप्न बघायला कुठे लागतात पैसे!" असा संताप त्यांनी व्यक्त केला होता.
Chhatrapati Sambhajinagar News: "बायको वाईट अन् बहीण चांगली..."
दुसऱ्या एका व्हिडिओत पती आणि नणंदेच्या नात्यावर भाष्य करताना संगीता म्हणाल्या, "जी बायको तुमच्या वाईट काळात तुमच्यासोबत उभी होती, तुमच्या आजारपणात हॉस्पिटलमध्ये चकरा मारत होती, उपवास करत होती... ती बायको वाईट आणि जी बहीण तुमच्या मयतीला येणार नाही असं सांगत होती, ती चांगली... कदाचित यालाच रक्ताचं नातं म्हणतात." या व्हिडिओंद्वारे त्यांच्या कुटुंबात सुरू असलेला प्रचंड तणाव आणि संघर्ष स्पष्टपणे दिसून येत आहे.
Chhatrapati Sambhajinagar News: सोशल मीडियावर माय-लेकाचं प्रेम अन् वादाचे सावट
संगीता यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर मुलासोबतचे अनेक भावूक क्षण शेअर केले होते. एका व्हिडिओमध्ये कुणाल आपल्या आईची ओटी भरतानाही दिसतो. एका बाजूला माय-लेकामधील हे अतूट आणि जीवापाड प्रेम दिसत असताना, दुसऱ्या बाजूला पती व नणंदेसोबत होणाऱ्या सततच्या वादांमुळे कुटुंबात मोठी अस्वस्थता होती. या कौटुंबिक वादाचा या सामूहिक शोकांतिकेशी काही थेट संबंध आहे का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
Chhatrapati Sambhajinagar News: खवड्या डोंगरावरती नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज MIDC परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर 21 ऑगस्ट 2026 रोजी एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये 19 वर्षीय कुणाल चांदगुडे, त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे (48) आणि आई संगीता चांदगुडे यांचा समावेश आहे.
Chhatrapati Sambhajinagar News: आई आणि लेकाचा काळीज चिरणारा शेवटचा संवाद
पोलीस, स्थानिक आणि आई कुणालला आत्महत्या न करण्यासाठी विनवणी करत होते. कुणालने खाली उतरावे म्हणून आईने जिवाच्या आकांताने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुझा पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ मी आताच मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते, आपण दोघं राहू, पण मला सोडून जाऊ नकोस, अशी आर्त विनवणी आई करत होती. दोघे हताश होऊन संवाद साधत होते. आईच्या आर्त हाकेनंतरही कुणाल, आई, माझे कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाइफचे सोल्युशनच नाही, काहीच होणार नाही गं, असं कुणाल म्हणाला आणि पुढे सगळं होत्याचं नव्हतं झालं.
