छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगरात दुचाकीचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गट आपसात भिडल्याची घटना समोर आली.  हा वाद एवढ्या विकोपाला गेले की, युवकांनी थेट चाकू बाहेर काढले. या घटनेमध्ये एक जण जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला तीन टाके पडले आहेत. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तर हातात चाकू घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांचे फोटो देखील समोर आले आहेत. तर, गेल्या काही दिवसांपासून शहरात होणाऱ्या खुनाच्या आणि हल्ल्यांच्या घटना पाहता पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक कमी झाला की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Crime news)


गेल्या काही दिवसांमध्ये क्षुल्लक कारणांमुळे वाद आणि हत्यारांचा वापर या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. तर हातात हत्यारे घेऊन दहशतीचे वातावरण पसरवण्याचे धक्कादायक प्रकार वारंवार समोर येत आहेत. अशातच छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगरात दुचाकीचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गट आपसात भिडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या मुलांनी थेड चाकूचा वापर करत एकमेकांना धमकवल्याचंही समोर आलं आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Crime news)


किरकोळ कारणावरून तरुणाचा चाकूने भोसकून खून


क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून चार ते पाच जणांच्या टोळीने मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि.5) रात्री साडेआठ ते नऊच्या वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मिसारवाडी भागातील गल्ली क्रमांक 10 येथे घडली. विकास ज्ञानदेव खळगे (30, रा. मिसारवाडी) असे मृताचे तर गौतम राजू जाधव (21) असं जखमी झालेल्या तरूणाचं नाव आहे.(Crime news)


पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, मृत विकास आणि आरोपी हे मिसारवाडी येथील एकाच गल्लीत राहतात. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विकास आणि चार ते पाच जणांच्या टोळक्यामध्ये क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ होऊन वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चार संशयितांनी विकासवर चाकूने हल्ला केला. चाकू भोसकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्याला वाचवण्यासाठी धावलेला त्याचा भाचा गौतम हा देखील चाकू हल्ल्यात जखमी झाला. नागरिकांनी दोघांना तात्काळ जखमी अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. रात्री साडेदहाच्या सुमारास विकासचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. तर गौतम याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.