Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: कौटुंबिक वादातून 19 वर्षीय कुणाल चांदगुडे आत्महत्या करण्यासाठी तिसगाव शिवारातील खवड्या डोंगराच्या कठड्यावर जाऊन उभा राहिला. त्याला वाचवण्यासाठी धावलेले वडील मुरलीधर चांदगुडे (48) मुलासह खोल दरीत (Chhatrapati Sambhajinagar Family News) कोसळले. पती, मुलापाठोपाठ आई संगीता (42) यांनीही क्षणार्धात त्याच दरीत उडी घेत मृत्यूला कवटाळले. सदर घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या खवड्या डोंगराची चर्चाही आता रंगली आहे. याचदरम्यान, खवड्या डोंगराबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तिसगाव शिवारातील शासकीय मालकीचा खवड्या डोंगर गौण खनिजांच्या बेकायदा उत्खननामुळे पोखरण्यात आला आहे. खोल खाणी, उभे कडे आणि असुरक्षित भागांमुळे हा परिसर आता आत्महत्या आणि दुर्घटनांचा धोकादायक स्पॉट ठरत आहे. 2020 ते 2026 या कालावधीतील उपलब्ध ढोबळ नोंदीनुसार, खवड्या डोंगर परिसरात किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, हा अधिकृत आणि सर्वसमावेशक आकडा नाही. डोंगराचे विनापरवाना उत्खनन करणाऱ्यांना तब्बल 150 कोटी रुपयांच्या दंडात्मक नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र प्रकरण अपिलात अडकल्यामुळे अद्याप दंडवसुली झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain)
सोशल मीडिया व्हिडिओमधील दावे आणि खवड्या डोंगरावरील घटनेचा नेमका संबंध काय? (Khavdya Dongar Chhatrapati Sambhajinagar)
संगीता चांदगुडे यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्या आणि मुरलीधर चांदगुडे यांच्या संसारात एका नातेवाईक महिलेच्या हस्तक्षेपामुळे वाद निर्माण होत असल्याचा त्यांनी आरोप केला होता. तसेच सुमारे आठ वर्षांपूर्वी त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला आणि त्यानंतर घरातील वाद अधिक वाढल्याचेही त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितल्याचे समोर आले आहे. या काळात काही नातेवाईकांकडून आपल्याला आणि पतीला त्रास झाल्याचाही दावा संगीता चांदगुडे यांनी केला होता. मुलाच्या मृत्यूच्या घटनेनंतर मुरलीधर चांदगुडे यांनाही या परिस्थितीचा मानसिक धक्का बसल्याचे त्यांनी सांगितल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. दरम्यान, या सोशल मीडिया व्हिडिओमधील दावे आणि खवड्या डोंगरावरील घटनेचा नेमका संबंध काय, याचा तपास पोलिसांकडून होणे महत्त्वाचे आहे. संगीता चांदगुडे यांनी उल्लेख केलेली तिसरी व्यक्ती कोण आहे, याची चर्चाही सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. त्यामुळे सोशल मीडिया पोस्टमधील आरोपांना अधिकृत निष्कर्ष न मानता, पोलीस तपासातून नेमके सत्य समोर येणार आहे.
नेमकं प्रकरण काय? (Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain)
कुणालचा वडिलांसोबत वाद झाला होता. त्यानंतर कुणाल 21 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 10 वाजता खवड्या डोंगरावर गेला. त्याचा हेतू टोकाचं पाऊल उचलण्याचा असल्याचं समोर आल्यानंतर आई-वडील त्याला समजावण्यासाठी डोंगरावर पोहोचले. कुणालला समजावण्याचे प्रयत्न सुमारे तीन तास सुरू होते. पोलिस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी खाली जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र कुणाल वारंवार आपली जागा बदलत होता. अखेर कुणालने डोंगरावरून उडी घेतली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर मुलगा आणि पती खाली पडल्याचे पाहून आई संगीता यांचाही दुर्दैवी अंत झाला. तिघांचाही डोंगराच्या खाली पडून मृत्यू झाला.
