Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain:छत्रपती संभाजीनगर येथील तिसगाव परिसरात असणाऱ्या एका डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या (Suicide news) करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला वाचवताना त्याच्या आई-वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संपूर्ण कुटुंब डोळ्यांदेखत मृत्यूच्या खाईत लोटले गेल्याने तिसगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कुणाल मुरलीधर चांदवडे (वय 18),मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास हा सगळा प्रकार सुरु झाला होता. कुणाल चांदवडे (Kunal Chandavde) हा नैराश्याच्या भरात खवड्या डोंगरावर जीव द्यायला गेला होता. त्याच्यापाठोपाठ त्याचे आई-वडील, तिसगावचे ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले. सकाळी दहा वाजल्यापासून कुणालचे आई-वडील आणि तिसगावचे ग्रामस्थ त्याची मनधरणी करत होते. मात्र, दुपारी एकच्या सुमारास कुणालने अखेर डोंगरावरुन खाली उडी टाकली आणि त्याला वाचवताना तोल जाऊन वडीलही खाली पडले. त्यापाठोपाठ आईनेही डोंगरावरुन खाली उडी टाकली. उंचावरुन खाली पडल्यामुळे या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. (Chhatrapati Sambhaji nagar news)
कुणाल चांदवडे सकाळी दहा वाजल्यापासून डोंगराच्या कड्यावर उभा होता. तिसगावच्या सरपंचांनी याबाबत बोलताना सांगितले की, तो वारंवार जागा बदलत होता. मात्र, आईशी बोलत होता. दुपारी एक वाजेपर्यंत हा प्रकार सुरु होता. आम्ही कुणालला अनेकदा विनवणी केली. पण तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचे वडील आधी डोंगराच्या खाली होते. आई वर उभी राहून त्याची समजूत काढत होती. शेवटच्या 15 ते 20 मिनिटांत वडील वर आले. आम्हाला वाटलं ते त्याला बोलण्यात गुंतवतील. मात्र, ते मुलाला धरायला गेले आणि दोघेही खाली पडले. त्यांच्यापाठोपाठ आईनेही खाली उडी मारली, असे तिसगावच्या सरपंचांनी सांगितले.
Boy Suicide on khavdya dongar: डोंगरावरुन उडी मारण्यापूर्वी कुणाल सगळ्यांना काय म्हणाला?
कुणाल चांदवडे हा डोंगराच्या कड्यावर जवळपास तीन तास उभा होता. तो वारंवार जागा बदलत होता. यादरम्यान, कुणालचे आई-वडील आणि तिसगावच्या ग्रामस्थांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 'तू जीव देऊन काय होणार आहे, आईकडे बघून तरी जग', असे ग्रामस्थांनी त्याला सांगितले. तिसगावचे सरपंचही याठिकाणी उपस्थित होते. त्यांनी कुणालकडे पाहून म्हटले, ' हे बघ मी सरपंच आहे गावचा, मोबाईल आहे माझ्याजवळ. तुला आयफोन 15 प्रो देऊ', असे त्यांनी म्हटले. त्यावर कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला आणि नंतर म्हणाल की, 'आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन आहे'. त्यावर कुणालच्या आईने, 'दुसरं सोल्यूशन नाही, असं का वाटतं तुला', असे रडवेल्या आवाजात म्हटले. यानंतर काहीवेळातच वडील जवळ आल्यानंतर कुणालने डोंगराच्या कड्यावरुन शरीर खाली झोकून दिले आणि त्याच्यासोबत वडील आणि त्याच्यापाठोपाठ आई असे तिघेही खाली पडून त्यांचा मृत्यू झाला.
आणखी वाचा
