चंद्रशेखर बावनकुळेंच्या दुष्काळ दौऱ्यात चोरट्यांचा सुळसुळाट; शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवत 12 हजार उकळले, जरांगेंच्या आंदोलनातही केलेली लूटमार
मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांच्या दौऱ्यातही या टोळीने लूटमार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Jalna: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bavankule) सध्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्याला कसलाही त्रास देऊ नका अशा सूचना करताना ते दिसतायत. पण त्यांच्याच दौऱ्यात शुक्रवारी चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. काल मंत्री बावनकुळे भोकरदन तालुक्यातील दगडवाडी गावात दुष्काळ पाहणी करण्यासाठी आले होते. दौरा आटोपून ते निघाले, इकडे शेतकरी ही आपापल्या घरी परतू लागले. तेवढ्यात एका टोळीने शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवत 12 हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आलेला. पोलिसांच्या तपासात त्यांच्या हाती लूटमार आणि चोरी करणारी एक आंतरजिल्हा टोळीच लागली आहे. मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांच्या दौऱ्यातही या टोळीने लूटमार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी या चोरट्याकडून एक कार आणि शेतकऱ्याकडून लुटलेले 12 हजार रुपये जप्त केले आहेत.
नेमके घडले काय?
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काल भोकरदन तालुक्यातील दगडवाडी गावात आले होते. मंत्र्यांचा दौरा उशिरा आटोपल्यानंतर ते तेथून रवाना झाले. त्यानंतर शेतकरीही आपापल्या घरी परतत होते. याच वेळी एका शेतकऱ्याला काही जणांनी अडवत चाकूचा धाक दाखवला आणि त्याच्याकडील 12 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
या घटनेनंतर संबंधित शेतकऱ्याने भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लुटमार करणारी आंतरजिल्हा टोळीच लागली. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एक कार आणि शेतकऱ्याकडून लुटलेली 12 हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे.
जरांगेंच्या दौऱ्यातही केलेली लूटमार
भोकरदन पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाडपासूनच महसूल मंत्र्यांच्या दौऱ्याच्या ठिकाणी पोहोचली होती, अशी माहिती समोर आली आहे. याच टोळीने यापूर्वी मनोज जरांगे यांच्या दौऱ्यादरम्यानही लुटमार केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
मंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असतानाही गर्दीचा फायदा घेत लुटमारीचा प्रकार घडल्याने दौऱ्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणात आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होतो का, तसेच टोळीतील आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास भोकरदन पोलीस करत आहेत.





















