Chandrapur Crime News : चंद्रपूर शहरातून एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. यात दोन जिगरी मित्रापैकी एकाचा मृतदेह आढळला तर दुसरा त्याच ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत सापडला आहे. मात्र ही हत्या नेमकी कुणी आणि कुठल्या करणातून झाली हे अद्याप कळू न शकल्याने या घटनेचे गूढ वाढलं आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याची चर्चा शहरात रंगली आहे. पण अंतिम सत्य ही पोलिसांच्या तपासातूनच कळू शकणार आहे.

प्रेम प्रकरणातून घटना घडल्याची चर्चा, गूढ कायम

मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या गडचांदूर येथे गुरुवार 10 एप्रिलला ही घटना घडल्याचे  उघडक झालं. यातील प्रज्वल गोवर्धन नवले (२१) असे मृतक युवकाचे नाव आहे. तर नागेश लांडगे असे बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या तरुणाचे नाव आहे.प्रज्वल आणि नागेश खास मित्र असल्याची माहिती आहे. प्रज्वल हा माणिकगड मार्गांवरीलएका गॅरेजमध्ये काम करत होता. तर त्याचे वडील गोवर्धन चिमूर येथे आणि आई शीतल नवले गृहणी असून ती गडचांदूर येथे राहतात. दोघे विभक्त असून प्रज्वल आईकडे राहत होता. बुधवारी त्याचा मित्र नागेश लांडगे हा प्रज्वलला भेटायला घरी गेला होता.

आईला कुणकुण होती, शेवटी नको तेच झालं! 

दरम्यान या भेटीमध्ये नागेशच्या हालचालीवरून प्रज्वलच्या आईला थोडी शंका आली. यावेळी आईने नागेशचा मोबाइल ताब्यात घेतला. आईने मोबाइल ताब्यात घेतल्याने आपले सर्व बिंग फुटणार अशी भावना नागेशच्या मनात निर्माण झाली. यावर त्याने  प्रज्वला विनंती करून आईकडून त्याचा मोबाइल परत मागितला आणि आईने प्रज्वललादेखील त्याचा मोबाइल मागितला. मात्र प्रज्वलने प्रथम नकार दिला व नंतर नागेशचा मोबाइल परत करण्याच्या बदल्यात स्वतःचा मोबाइल आईला दिला. नागेशचा मोबाइल परत मिळाल्यानंतर लगेच दोघे सायंकाळी सायकलने घराबाहेर गेले. त्यानंतर नेमकं काय घडलं हे आद्याप कळू शकलेलं नाही. दुसऱ्या दिवशी ( गुरुवारी ) सकाळी प्रज्वल मृतावस्थेत तर  नागेश बेशुद्ध अवस्थेत आढळल्याची बातमी कुटुंबियांना मिळाली. त्यानंतर कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना घटनेची माहिती दिली. सध्या या घटनेचे गूढ कायम असून हे प्रकरण नेमकं कशामुळे झालं हे शोधून काढणं आता पोलीसांपुढेच आव्हान असणार आहे.    

इतर महत्वाच्या बातम्या