परभणी : पाथरी येथील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बी एस कांबळे या सामाजिक कार्यकर्त्यांने आत्महत्या करत एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात बाबाजानी दुर्राणी यांच्यासह अजून एक जणाच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. या दोघांनी त्रास दिल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्यामध्ये लिहिलं आहे. त्यानंतर पाथरी पोलिसांनी दुर्राणी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.  


पाथरी येथील 60 वर्षीय सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण कांबळे यांनी मंगळवारी पहाटे शेतात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्याआधी त्यांनी जी चिठ्ठी लिहिली होती.


बाळकृष्ण कांबळे यांनी लिहिलेली चिठ्ठी जशास तशी, 


माझ्या आत्महत्येस कारणीभूत 


1. सर्वात मोठा धोकेबाज व मला बेईमान झालेला माजी आमदार अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्वाणी उर्फ बाबाजानी याचे विरोधात मी माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलेल्या दोन तक्रारी दिनांक 7/7/2024 व 8/8/2024 रोजी दिलेल्या सविस्तर तक्रारी 


2. माननीय उपलोकायुक्त मुंबई यांच्याकडे दिलेली 2021 पासून दिलेल्या दोन-तीन तक्रारी 


3. माझे नातेवाईक स्वार्थी आणि शेजारी यांच्या त्रासाला व न्याय न देणारे प्रशासन व राजकीय स्वार्थी कार्यकर्ते यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे.  त्यामध्ये माझ्या कुटुंबाचा काही संबंध नाही. मी आत्महत्या विचारपूर्वक केली आहे. फक्त आज दिनांक 12.8.2024 ठिक  सायंकाळी 5.30 वाजता.


मुलाची पोलिसात तक्रार


चिठ्ठी मिळाल्यानंतर कांबळे यांच्या नातेवाईकांनी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळी साडेसात वाजता कांबळे यांचा मुलगा अजयसिंह याने पोलिसांत तक्रार दिली. त्यात पाथरी येथील बाबाजानी दुर्राणी यांना आपल्या वडिलांचे नावे असलेला माजलगाव रोडवरील कॅनालजवळील प्लांट तसेच शेत जमीनीमधील पडलेले प्लॉटिंग यातील ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाहीत अशी माहिती दिली. त्यामुळे वडील तणावात असायचे अशी माहितीही त्यांनी दिली. 


वडिलांना अनेक वेळा बाबाजानी दुर्राणी यांचेकडे चक्करा मारून पैसे मागितले. परंतु त्यांनी  झालेल्या व्यहाराचे पैसे दिले नाहीत. तसेच आमचे शेताचे शेजारी आणि आमचे नातेवाइक यांनी देखील वडिलांना त्रास देणे सुरू केले होते. त्यामुळे माझे वडील नेहमी टेंशन मध्ये असायचे. त्यामुळे माझ्या वडिलांना वर नमूद सर्व लोंकानी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आणि वडिलांनी या सर्व लोकांच्या त्रासाला कंटाळुन शेतातील आखाड्यावर विषारी आषध प्राशन करून आत्महत्या केली.


यावरून राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह त्यांच्या शेताचे शेजारी विजय वाकडे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.