कॅनरा बँकेत मोठा दरोडा, तब्बल 59 किलो सोन्यासह 5 लाख रुपये लुटले, अलार्म सिस्टीम बंद करत नियोजनबद्ध चोरी
कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कॅनरा बँकेच्या शाखेतून अत्यंत नियोजनबद्ध दरोडा टाकण्यात आला आहे.

Canara Bank heist : कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कॅनरा बँकेच्या शाखेत अत्यंत नियोजनबद्ध दरोडा टाकण्यात आला आहे. यामध्ये अज्ञात दरोडेखोरांनी सुमारे 59 किलो सोन्याचे दागिने आणि 5.2 लाख रुपयांची रोख रक्कम लुटली आहे. ही घटना 25 मे रोजी मनागुली टाउन येथील सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शाखेत घडल्याचे समोर आले आहे. या टोळीने अलार्म सिस्टीम बंद केली आणि लॉकर उघडण्यासाठी एका बनावट चावीचा वापर केला. चोरी केल्यानंतर चोरांनी लॉकरमध्ये सोन्याच्या जागी काळी बाहुली ठेवली होती. देशातील सर्वात मोठ्या दरोड्यांपैकी हा एक दरोडा असल्याचं बोललं जात आहे.
विजयपुराचे पोलिस अधीक्षक (एसपी) लक्ष्मण निंबर्गी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी एका सफाई कर्मचाऱ्याला दरोडा पडल्याचे लक्षात आले. यानंतर 26 मे रोजी, मंगोडी येथील कॅनरा बँकेच्या व्यवस्थापकाने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 24 तारखेला, चौथा शनिवार होता त्यामुळं बँक बंद होती. 25 तारखेला सकाळी सफाई कर्मचारी साफसफाईसाठी आला तेव्हा शटरचे कुलूप तुटलेले आढळले. त्यानंतर या चोरीची माहिती देण्यात आली.
दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 59 किलो सोने चोरीला गेले आहे. हे सोने कर्जासाठी तारण ठेवलेल्या ग्राहकांचे होते, अशी माहिती देण्यात आली आहे. सहा ते आठ सदस्यांच्या टोळीने बनावट चावी वापरुन सोन्याचे लॉकर एका विशिष्ट चावीने उघडले. दोन दिवस बँकेचे निरीक्षण केल्यानंतर दरोडेखोर बँकेत घुसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सुरुवातीला त्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडले, अलार्म सिस्टम बंद केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्हेगारांना बँकेच्या अंतर्गत व्यवस्थेची पूर्व माहिती होती, असेही पोलिस म्हणाले.
दरोडेखोरांनी काळ्या रंगाची बाहुली बँकेत ठेवली
तपासाकडे लक्ष वेधण्यासाठी दरोडेखोरांनी काळ्या रंगाची बाहुली बँकेच्या खिडकीजवळ ठेवली होती. ज्यामध्ये काळ्या जादूच्या पद्धतींचा इशारा होता, असा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांचा असा विश्वास आहे की तपासकर्त्यांना दिशाभूल करण्यासाठी आणि गुप्त सहभागाची भावना निर्माण करुन प्रकरणातील प्रगतीला विलंब करण्यासाठी हे जाणूनबुजून केलेले कृत्य होते. ही एक अत्यंत व्यावसायिक आणि नियोजित दरोडा होता. चोरीच्या वेळी बँकेत अंदाजे 53 कोटी रुपये किमतीचे सोने आणि 7 लाख रुपये रोख रक्कम होती. हर्नल आणि हुबळी सारख्या शेजारच्या जिल्ह्यांतील लोकांनी कर्जासाठी या शाखेत त्यांचे सोने गहाण ठेवले होत. गुंतलेल्या मालमत्तेचे प्रमाण आणि मूल्य पाहता, हे देशातील सर्वात मोठ्या बँक दरोड्यांपैकी एक असू शकते अशी माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ग्राहकांनी कॅनरा बँकेच्या सुरक्षेवरही उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
कॅनरा बँकेच्या ग्राहकांनी सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हा ग्राहकांचा दोष नाही. त्यांनी बँकेवर विश्वास ठेवून मौल्यवान वस्तू बँकत ठेवल्या होत्या. सुरक्षेच्या बाबतीत बँकेने अधिक दक्षता घ्यायला हवी होती असेही ग्राहक म्हणाले. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी आठ पथके तयार केली आहेत. तपास सातत्याने सुरू आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असी माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:


















