डोंबिवली : ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केल्याचे खोटे मेसेज दाखवून सोनाराकडून सव्वा चार लाखाचे सोने घेऊन पसार झालेल्या भामट्याला कल्याण क्राइम ब्रान्चने 24 तासात बेड्या ठोकल्या आहेत .विनय लोहिरे असे या भामट्याच नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात याआधी देखील पुणे व ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत .
डोंबिवली पूर्वेकडील नार्वेकर ज्वेलर्स या दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने एका इसम दुकानात आला. घरात लग्नसराई असल्याने आजच सोनं विकत घ्यायच असल्याचे त्याने सांगितले. दुकानातून तब्बल 4 लाख 22 हजाराचे सोन्याचे दागिने त्याने विकत घेतले. त्यानंतर त्याने दुकान मालकाला रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केल्याचं सांगितले. दुकानदाराने बँक खाते तपासले मात्र पैसे नव्हते मात्र या इसमाने त्याला पैसे ट्रान्सफर झाल्याचा खोटा मेसेज दाखवला . तसेच एक चेक देखील दिला. त्यानंतर दुकानदाराने त्याला जाऊ दिले. मात्र काही वेळाने पैसे ट्रान्सफर न झाल्याने दुकानदाराने शहानिशा केली असता या भामट्याने दाखवलेला मेसेज खोटा असल्याचे दुकानदाराच्या निदर्शनास आले. मात्र तोपर्यंत हा भामटा दुकानातून निघून गेला होता. हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.
घडल्या प्रकाराबाबत दुकानदाराने डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली .डोंबिवली पोलिसांसह कल्याण क्राइम ब्रान्चने देखील या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ,तांत्रिक पद्धतीने तपास करत शोध सुरू केला. अखेर हा इसम अंबरनाथ येथे राहत असल्याची माहिती मिळाली. तात्काळ कल्याण काळे यांच्या पथकाने अंबरनाथमधून या भामट्याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. विनय लहिरे असे या भामट्याचे नाव असून त्याच्या विरोधात याआधी देखील इतर शहरात फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली .
अशाप्रकारे कुणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तत्काळ डोंबिवली पोलीस ठाणे किंवा कल्याण क्राइम ब्रान्चशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील कल्याण क्राइम ब्रान्चचे अधिकारी मोहन कळमकर यांनी केले आहे