Buldhana Crime News : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल करून जीवे मारण्याच्या धमकी (Death Threat to Eknath Shinde) देणाऱ्या दोन आरोपींना बुलढाणा (Buldhana Crime) जिल्ह्यातील देऊळगावच्या मही येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई एटीएसने(ATS) ही कारवाई करत या आरोपींना ताब्यात घेऊन मुंबईकडे निघाले आहे. धमकीची हे प्रकरण ताजे असताना बुलढाणा जिल्ह्यातून पुन्हा एक असाच धमकी देत जीवे मारण्याचे पत्र पुढे आले आहे. बुलढण्यातील चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्वेता महाले यांच्या चिखली येथील निवासस्थानी हे धमकीचं पत्र मिळालं आहे.
या धमकीच्या पत्राने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणी आमदार श्वेता महाले आज (21 फेब्रुवारी) दुपारी आपल्या समर्थकांसह चिखली पोलिसात तक्रार देणार असल्याची ही माहिती पुढे आली आहे. दरम्यान या पत्रात श्वेता महाले यांच्या बद्दल अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. मात्र हे पत्र नेमकं कोणी आणि का पाठवलं, याचे कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचे प्रकरण ताजे असताना बुलढाणा जिल्ह्यातून असेच एक दुसरे प्रकरण पुढे आले आहे.
एकनाथ शिंदे यांना ई-मेल करून जीवे मारण्याच्या धमकी; दोघांना बेड्या
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल करून जीवे मारण्याच्या धमकी देणाऱ्या मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे अशा या दोन आरोपींना मुंबई एटीएसने(ATS) अटक केली आहे. मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे याचं देऊळगाव मही येथे मुख्य मार्गावर मोबाईल शॉपी आहे. हे दोघेही संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांनाही दारूचे व्यसन असून या दोघांनी अभय शिंगणे याच्या मोबाईल शॉपीतून ही धमकी दिल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही नात्याने मामा आणि भाचे आहेत. मंगेश हा नात्याने अभयचा मामा आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या धमकी मागेल नेमकं कारण काय? हे ही आता तपासानंतर कळू शकणार आहे.
अशा फुकट धमक्यांना कधीही भीत नाही- एकनाथ शिंदे
दुसरीकडे या धमकी प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत अशा फुकट धमक्या खूप येत असतात. आमचे सरकार हे प्रचंड मजबूत आहे. गृहखातं मजबूत आहे. अशा बदमाशी करणाऱ्या ई-मेल ला शोधून काढतील. ज्यांनी धमकी दिली असेल आणि ते तपासात निष्पन्न होईल. त्यांना सोडले जाणार नाही. एकनाथ शिंदे यांना गडचिरोलीचे पालकमंत्री असताना सुद्धा धमक्या आल्या होत्या. त्यामुळे अशा धमक्यांना मी भीत नसल्याची स्पष्टोक्ती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
हे ही वाचा