Karnataka News: कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील यड्रावी तालुक्यातील इजेरी गावातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह हात बांधलेल्या स्थितीत एका विहिरीत आढळून आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, हा घातपात असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 16 आणि 17 वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह शनिवारी सकाळी गावातीलच एका विहिरीत तरंगताना आढळले. विशेष म्हणजे, या दोन्ही मुलींचे हात दोरीने बांधलेल्या अवस्थेत होते. सकाळी ग्रामस्थ विहिरीकडे गेले असता हा प्रकार उघडकीस आला. आपल्या पोटच्या मुलींची ही अवस्था पाहून पालकांनी घटनास्थळी एकच टाहो फोडला.

पोलीस तपासाला वेग

घटनेची माहिती मिळताच जेवरगी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मुलींचे हात बांधलेले असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास  विविध अंगानी सुरू केला आहे. दोन अल्पवयीन मुलींचा अशा प्रकारे संशयास्पद मृत्यू झाल्याने इजेरी गावात तणावाचे वातावरण आहे. या बहिणींनी असे टोकाचे पाऊल उचलले की त्यांना बळजबरीने विहिरीत ढकलण्यात आले, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं

दुसरीकडे, कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील नागठाण गावात एक विचित्र घटना उघडकीस आली होती. मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही असे टोमणे गावातील लोकांनी वारंवार मारल्यामुळे जन्मदात्या बापानेच आपल्या सहा वर्षाच्या मुलाला कृष्णा नदीत बुडवून संपवल्याची घटना तब्बल एक महिन्याने उघडकीस आली. सिद्धार्थ मल्लिकार्जुन अरकेरी (6) असे बापाने नदीत बुडवून मारलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. 16 मार्चला मुलाला कराडजवळ वडोली गावाजवळ कृष्णा नदीत बुडवून बापाने जीव घेतला. गावातील लोक वारंवार तुझा मुलगा तुझ्या सारखा दिसत नाही म्हणून सतवत असल्याने मल्लिकार्जुन अस्वस्थ झाला होता.

मुलाला शाळेत घालून येतो म्हणून मल्लिकार्जुन घरातून मुलाला घेऊन बाहेर पडला. नंतर कराडजवळ वडोलीत नेऊन नदीत मुलाला बुडवून मारले. मुलाला सिंदगी गावातील शाळेत दाखल केले असून तो हॉस्टेलमध्ये राहत असल्याचे मल्लिकार्जुनने घरी आल्यावर सांगितले. एक एप्रिल रोजी सिद्धार्थचा वाढदिवस होता म्हणून पत्नी भाग्यश्रीने मुलाला घरी घेऊन या असा तगादा लावल्यावर मल्लिकार्जुन पळून गेला. त्यामुळे संशय आल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत मल्लिकार्जुनने मुलाला कृष्णा नदीत बुडवून मारल्याची कबुली दिली.

 

इतर महत्वाच्या बातम्या