कल्याण:  उल्हासनगरमध्ये (UlhasNagar Crime)  भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad)  यांच्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार  झाला आहे,  भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh  Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला आहे गोळीबारप्रकरणी गणपत गायकवाडसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती मिळत आहे.


उल्हासनगर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आमदार गणपत गायकवाड ,हर्षित केणे, संदीप सरवडकर आणि तीन जणांना उल्हासनगर हिल लाईन पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. तर आमदार गणपत गायकवाड ,हर्षित केणे, संदीप सरवडकर यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. तीन जणांचा पोलिसांकडू शोध सुरु आहे. आज दुपारी या तिघांना उल्हासनगर कोर्टात करणार हजर करणार आहेत. 


दरम्यान ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहेत. कल्याणचे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. दरम्यान कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर  मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या.  सध्या महेश गायकवाड यांची प्रकृती स्थिर आहे. महेश गायकवाड यांच्यावरती सहा गोळ्या झाडल्या होत्या. त्या गोळ्या काढण्यामध्ये डॉक्टर यशस्वी झाले आहे.


बॉडीगार्डच्या बंदुकीतून झाडल्या गोळ्या


केबिनमध्ये या तिघांची चर्चा सुरू असताना बाहेर गोंधळ झाला तो गोंधळ पाहण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप बाहेर गेले. तेवढ्यात गणपत गायकवाड महेश पाटील यांच्यामध्ये वाद सुरू झाला आणि त्या वादामध्ये गायकवाड यांच्या जवळ असलेल्या बंदुकीमधून त्यांनी पाच गोळ्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या दिशेने झाडल्या. गणपत गायकवाड यांच्या रिव्हॉलवर मधल्या गोळ्या संपल्यानंतर त्यांच्यासोबत खाजगी अंगरक्षकाने त्याच्या जवळील बंदुकीमधून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली.  त्यावेळी त्या केबिनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक आले आणि त्यांनी त्या अंगरक्षकाची बंदूक पकडली आणि पुढील अनर्थ टळला.


जमिनीच्या वादातून गोळीबार?


मिळालेल्या माहितीनुसार, एका 50 गुंठे जमिनीचा वाद सुरू होता. मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू होते. शुक्रवारी गणपत गायकवाड यांच्या मुलांसोबत पोलीस स्टेशनमध्ये वाद सुरु असताना गणपत गायकवाड यांनी  येऊन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे.