Ganpat Gaikwad Firing Case : शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 5 जणांना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उल्हासनगरमधील (Ulhasnagar) हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये (Hill Line Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनमध्येच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. याप्रकरणी गणपत पाटील यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांची आज, 14 फेब्रुवारी पोलीस कोठडी संपली. आज त्यांना न्यायालयात हजर केले. गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींचा एमसीआर काढण्यात आला. कोर्टाने गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनवली आहे.
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बुधवारी सकाळी पोलिसांनी गायकवाड यांच्यासह अन्य आरोपींना उल्हासनगर चोपडा कोर्टात हजर केले. त्यावेळी न्यायालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याशिवाय अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायाधीशांनाही पहाटेच न्यायालयामध्ये आणून ठेवण्यात आले होते. दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले होते. सरकारी वकिलांनी गणपत गायकवाड यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्याला गणपत गायकवाड यांनी विरोध केला. दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टानं आरोपींना 14 दिवासांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सरवनकर व रणजित यादव यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय? घटना सीसीटिव्हीत कैद
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिल लाइन पोलीस ठाण्यात गोळीबार केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हा सर्व थरार पोलिस स्टेशनच्या सीसीटिव्हीत कैद झाला. घडलेला प्रकार असा की, आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड उल्हासनगर येथील 'हिल लाईन' पोलीस ठाण्यात आले. तसंच शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील देखील तिथं आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी वैभव यांनी पुन्हा आमदारांशी फोनवरून संपर्क साधत पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आमदार गणपत गायकवाड गायकवाड देखील 'हिललाइन' पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यावेळी गणपत गायकवाडसह त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं पोलीस ठाण्यात जमा झाले. आमदार गायकवाड पोलीस ठाण्यात येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या केबिनमध्ये गेले. त्या केबिनमध्ये आगोदरच महेश गायकवाडसह त्यांचा साथीदार राहुल पाटील उपस्थित होते.तिघं वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप केबिनमध्ये चर्चा करत असताना पुन्हा गणपत गायकवाड यांची महेश पाटील यांच्यात वाद झाले. अप्पर पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेव्हा गायकवाड यांनी त्यांच्याजवळील बंदुकीतून महेश गायकवाडसह राहुल पाटील यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. गायकवाड यांच्या बंदुकीतील गोळ्या संपल्यानतंर त्यांच्या खासगी अंगरक्षकानं त्यांच्याजवळील बंदुकीतून गोळीबार सुरू केला. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षकानं अंगरक्षकाची बंदूक हिसकावून घेतल्यानं पुढील अनर्थ टळला.