कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
आपल्या घरातील चोरीच्या घटनेनंतर केसरवाणी यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे : जिल्ह्यातील भिवंडीत (bhiwandi) घरफोडीच्या घटनांना उत आला असून कापआळी परिसरात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून तब्बल 23.5 तोळे सोने, 500 ग्रॅम चांदी आणि 1 लाख 20 हजार रुपयांची रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. धर्मेंद्र लालचंद केसरवाणी हे पत्नी आणि मुलांसह घराला कुलूप लावून घुंटणगर परिसरात फिरण्यासाठी गेले होते. मध्यरात्री सुमारे एक वाजता घरी परतल्यानंतर घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळून आले. घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र, अंगठ्या, नेकलेस, बांगड्या, झुमके आणि इतर दागिने तसेच चांदीची पायल आणि रोकड चोरून नेली. याप्रकरणी, पोलिसात (Police) फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
आपल्या घरातील चोरीच्या घटनेनंतर केसरवाणी यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चोरी केल्यानंतर चोरटा दागिन्यांनी भरलेली बॅग खांद्यावर घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. विशेष म्हणजे घरमालकांनी सांगितल्याप्रमाणे, घरातून 23.5 तोळे सोना, अर्धा किलो चांदी आणि एक लाख 20 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरी झाला आहे. परंतु, पोलिसांनी 10 तोळे सोनं चोरीची नोंद केली आहे. तसेच, या सोन्यांचे दागिन्यांचे अधिकृत बिल त्यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. चोरीच्या या घटनेनंतर जी बॅग चोरट्यांनी पळवली होती, ती बॅग घटनास्थळापासून तब्बल एक किलोमीटर अंतरावर पोलिसांना मिळून आली आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे. जीवनभराची कमाई आणि मुलांच्या भविष्यासाठी जमवलेला ऐवज चोरीला गेल्याने केसरवाणी कुटुंबीयांनी पोलिसांनी चोरट्याला लवकरात लवकर अटक करून चोरीचा मुद्देमाल परत मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे. तसेच, सर्वसामान्यांच्या घरातून अशाप्रकारे चोरीच्या घटना घडत असल्याने तीव्र संतापही व्यक्त होत आहे.
भिवंडीत नदीनाका-पारोळ मार्गाची दुरवस्था
भिवंडी शहरालगतच्या शेलार नदीनाका-पारोळ मार्गावरील सिमेंट काँक्रीटचा रस्ता खचल्याने विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ता खचून चार दिवस उलटले तरी कायमस्वरूपी दुरुस्ती झालेली नाही. खचलेल्या भागाला सध्या टोपली आणि बांबूच्या काठीचा तात्पुरता आधार देण्यात आला आहे. मात्र, रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्था आणि सूचना फलक नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. खचलेल्या रस्त्यालगतच्या नाल्यात रासायनिक प्रक्रियेनंतरचे गरम पाणी सोडले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे नाल्यात पडल्यास गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करून गरम पाण्याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा





















