Bhiwandi Crime News: हुंड्याच्या हव्यासापोटी अघोरी कृत्य, कर्करोगग्रस्त पत्नीच्या घरात नवऱ्याकडून जादूटोणा; भिवंडीतील धक्कादायक घटना
Bhiwandi Crime News: पत्नी कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असतानाच हुंड्यासाठी तिच्या घरात जादूटोणा व जंतर-मंतर केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीमध्ये उघडकीस आला आहे.

Bhiwandi Crime News: पत्नी कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असतानाच हुंड्यासाठी तिच्या घरात जादूटोणा व जंतर-मंतर केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी (Bhiwandi) शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी 36 वर्षीय पीडित पत्नीच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे भिवंडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे योगेशकुमार केशरवानी (पती), ओमकारनाथ केशरवानी (सासरा), चंद्रावती केशरवानी (सासू), भावना मल्होत्रा, अनुराधा अरोरा आणि श्रद्धा बोबडे (तीन नणंद – सर्व रा. डोंबिवली) अशी आहेत.
पीडित महिला सध्या भिवंडीत राहत असून ती कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात उपचार घेत आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, सन 2015 पासून सासरच्यांकडून हुंड्यासाठी सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. पीडितेला ‘अपशकुनी’ ठरवत प्रत्येक अमावस्येला घरात काळ्या जादूची पूजा मांडून तिला मानसिक त्रास देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. सप्टेंबर 2025 मध्ये आपल्याला कर्करोग झाल्याचे निदान झाल्यानंतरही आरोपींनी उपचार करण्याऐवजी छळ अधिक वाढवला. 7 डिसेंबर रोजी पतीने तिला लहान मुलासह घराबाहेर हाकलून दिले, तसेच उपचारासाठी मदत न करता उलट तिच्या मुलाला आणि बहिणीला मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
Bhiwandi Crime News: पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
इतकेच नव्हे तर 22 जानेवारी 2026 रोजी आरोपी पतीने पीडित महिला राहत असलेल्या भिवंडीतील घराच्या दरवाज्यासमोर कुंकू, कापलेली लिंब आणि काळ्या बाहुल्या टाकून जादूटोणा केला, हा प्रकार आपल्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशानेच केल्याचे पीडितेने म्हटले आहे. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत निजामपूरा पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात भा.न्या.सं. कलम 85, 115(2), 127, 351(2), 352, 3(5) तसेच महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
























