ठाणे : भिवंडी येथील नारपोली पोलिस ठाण्यातील (Bhiwandi Narpoli Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना नारपोली पोलिस ठाण्यातच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं. खुनाच्या गुन्ह्यातून मुलाचं नाव कमी करण्यासाठी त्याने आरोपीच्या आईकडून लाच मागितली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 25 नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या 16 वर्षांचा योगेश रवी शर्मा या अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह गाडून, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे 7 डिसेंबर रोजी उघड झाले होते. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी दाखल केलेल्या हत्येच्या गुन्ह्यात आयुश विरेंद्र झा, मनोज नारायण टोपे, अनिकेत तुकाराम खरात, शिवाजी धनराज माने, संतोष सत्यनारायण ताटिपामुल या आरोपींना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार हे करीत होते.


गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी लाच मागितली


आरोपी अनिकेत खरात याचे नाव गुन्ह्यातून कमी करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, नाहीतर कुटुंबीयांना या प्रकरणात अडकवण्याची धमकी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांनी दिली. त्यानंतर त्याने अनिकेतच्या आईकडे 5 लाखांची मागणी केली. त्यानंतर तडजोड होऊन अनिकेतच्या आईने दोन लाख देण्याचे कबूल केले.


दरम्यान, अनिकेतच्या आईने सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नारपोली पोलिस ठाण्यात मंगळवारी सकाळी केलेल्या कारवाईत शरद पवार यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 


महसूलमंत्र्यांच्या संस्थेकडेच मागितली लाच


शिर्डीत चक्क महसूलमंत्र्यांच्या संस्थेकडून लाच घेताना वजनमापे निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलंय. अशोक श्रीपती गायकवाड असे या अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. हा अधिकारी महसूलमंत्री विखे पाटील यांच्या सहकारी संस्थेच्या पेट्रोलपंपाची वार्षिक  तपासणी करून स्टॅपिंग प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात लाच घेण्याची मागणी केली. हीच लाच घेताना या आरोपीला लाचलुचपत विभागानं अटक केली आहे. यासंदर्भात पेट्रोलपंप व्यवस्थापकाने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तडजोडीअंती त्याने 10 हजार रुपये घेण्याचे मान्य केले.  या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.


ही बातमी वाचा: