मुंबई : अनकेदा गुन्हेगाराचा उदात्तीकरण करुन गुन्हेगारी वृत्तीला खतपाणी घालण्याचं काम करण्यात येतं. सोशल मीडियावरुन (Social media) सध्या अशा प्रवृत्ती सातत्याने समोर येत आहेत. रील्स आणि व्हिडिओ व्हायरल करत हवा करण्याचा या भाई लोकांचा छंद असतो. त्यातून, तरुणाईला आपल्याकडे वळवत गुन्हेगारीचा बादशाह, डॉन, भाई अशा उपाधी लावून हे मिरवतात. त्यामुळे, पोलिसांचा अशा गुंडांवर वचक आहे की नाही, असा सवाल निर्माण होत असतो. आता, भांडुपमधील (Mumbai) एका अन्सारीभाईचा असाचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे या गुंडाने जेवढे गुन्हे केले आहेत, त्याची कलमे लिहिलेला केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसांचे व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. 

भांडुपमधील कुख्यात गुंडाने केलेल्या गुन्ह्याची कलमे लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा केल्याचे समोर आले आहे. झिया अन्सारी असे या गुंडाचे नाव असून त्याच्यावर आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून जामीनावर बाहेर आला आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्याचा वाढदिवस असल्याने त्याने अनोखा केक बनवून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 

विविध गुन्ह्यात त्याच्यावर लागलेल्या कलमांसह पुढील गुन्हा आता काय करणार? यासाठी प्रश्नार्थक चिन्ह टाकून वाढदिवसासाठीचे केक सजवण्यात आल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी रिल्स आणि सोशल मीडियावर या वाढदिवसाचे फोटो व्हायरल केले आहेत. त्यानंतर, या गुन्हेगारी वाढदिवसांची गंभीर नोंद पोलिसांनी घेतली असून आरोपीला तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा

मशिन मुंबई, भाजप भाकरी फिरवणार; अध्यक्षपदासाठी बैठक, दोन आमदारांनी नावे समोर