Beed : गळफास घेताना साडी फाटल्याने थोडक्यात बचावले, शिंदेंच्या बीड तालुका उपप्रमुखाचा आत्महत्येचा प्रयत्न
Beed Crime News : आत्महत्येचे पाऊल उचलण्यापूर्वी भारत देवकते यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेट्सवर एक चिठ्ठी आणि गळ्यात साडी बांधलेला फोटो ठेवला होता. त्यांनी सरपंच आणि ग्रामसेवकावर आरोप केले आहेत.

बीड : शिंदेंच्या शिवसेनेचे बीड उपतालुकाप्रमुख भारत देवकते यांनी बीड जवळील म्हसोबा फाटा परिसरात बाभळीच्या झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने साडी फाटल्याने ते खाली पडले. त्यावेळी नागरिकांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर आयसीयू कक्षात उपचार सुरू आहेत.
आत्महत्येचे पाऊल उचलण्यापूर्वी भारत देवकते यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेट्सवर एक चिठ्ठी आणि गळ्यात साडी बांधलेला फोटो ठेवला होता. “दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र!” असे लिहित त्यांनी आपल्या या परिस्थितीसाठी ढेकणमोहा गावचे सरपंच पती शिवाजी भगवान गाडीवान आणि ग्रामसेवक बी. जी. तांदळे यांना जबाबदार धरले.
चिठ्ठीमध्ये नावे लिहित आरोप
भारत देवकते यांनी स्टेट्समधील चिठ्ठीत नमूद केले आहे की, मी गावातील गायगोठा, विहीर, शेततळे यांसारखी कामे नि:शुल्क दरात करण्याचे ठरवले होते. मात्र, सरपंच पती आणि ग्रामसेवक यांना हे मान्य नव्हते. त्यांच्या मनमानी कारभारामुळे आणि सततच्या मानसिक त्रासामुळे मी माझे जीवन संपवत आहे. या दोघांना माझ्या मृत्यूसाठी दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चिठ्ठीतून देवकते यांनी केली.
भारत देवकते यांनी आपल्या मित्रांना आणि शिवसैनिकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, या निर्णयासाठी त्यांची पत्नी, मुलगा किंवा कुटुंबातील कोणालाही दोषी धरू नये. तसेच त्यांनी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनाही शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ केला. या घटनेमुळे जिल्ह्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ही बातमी वाचा:























