बीड : जिल्ह्यातील परळी शहरात संतापजनक प्रकार समोर आला असून स्नेह नगर भागात मध्यरात्रीनंतर गाईंना वेगवेगळ्या पदार्थाच्या माध्यमातून गुंगीचे औषध खाऊ घालून त्यांना पळून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हा प्रकार परिसरातील लोकांच्या लक्षात येताच आरडाओरड झाल्याने हे चोरटे पळून गेले.विशेष म्हणजे चोरट्यांचा झायलो आणि अर्टिगा गाडीतून गाई नेण्याचा प्रयत्न असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. चोरीच्या प्रयत्नांची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 

गाई बेशुद्ध पडल्या

ज्या गाईंनी हे पदार्थ खाल्ले होते त्या गाईंना हालचाल देखील करता येत नव्हती. यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, चोरटे गाडीतून उतरले आणि त्यांनी गाईंना ब्रेड, शेंगदाणे खाऊ घातले. त्यानंतर काहीच वेळात त्या गाई बेशुद्ध पडल्या. 

एकूण सहा गाई त्या ठिकाणी बेशुद्ध पडल्या. त्यावेळी बेशुद्धावस्थेतील त्या गाईंना पळवण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. नेमकं त्यावेळी काहीजण त्या ठिकाणी आले. चोरट्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर चोरट्यांनी पलायन केलं. 

अशीच प्रकरणं या आधीही झाल्याचं नागरिकांनी सांगितलं. या सर्व प्रकरणाची दखल पोलिसांनी घ्यावी आणि अशा पद्धतीने गाई चोरी करणाऱ्यांचा शोध लावावा अशी मागणी आता गोप्रेमी नागरिक करत आहेत. सहा गाईंपैकी पाच गायींची तब्येत उपचारानंतर सुधारली असून आता एक गाय गंभीर आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

ही बातमी वाचा: