Beed District Jail Crime News: सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh) आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) त्याच्या साथीदारासह बीडच्या कारागृहात आहे. मात्र सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून बीडचे कारागृह आणि कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड वादाच्या भोवऱ्यात सापडतायत. कैद्याकडून आधी स्वतःच्या मालकीच्या गाडीची धुलाई, जिल्हा कारागृह परिसरातील अवैध वृक्षतोड आणि आता जेल मधील कैद्यांच्या धर्मांतरामुळे पेट्रस गायकवाड वादाच्या भोवऱ्यात सापडले. 

Continues below advertisement

बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांना धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणला जातो. त्यासाठी त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप बंदिवान कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी केला. बीड जिल्हा कारागृहातील चार कैदी वकील राहुल आघाव यांच्याकडे पक्षकार म्हणून आहेत आणि याच कैद्याच्या लेखी तक्रारीवरून एडवोकेट राहुल आघाव यांनी कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड (petrus gaikwad) यांच्यावर गंभीर आरोप केले. 

कैद्यांचे वकील राहुल आघाव काय म्हणाले?

तीन हिंदू आणि एक मुस्लिम पक्षकारावर कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड धर्म परिवर्तनासाठी दबाव आणतात. धर्म परिवर्तन करत नसल्यास त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला जातो. त्यामुळे जिल्हा कारागृहात सध्या दहशतीचे वातावरण असल्याचा गंभीर आरोप आघाव यांनी यावेळी केला. दरम्यान या प्रकरणी उच्च न्यायालयात कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्या विरोधात याचिका दाखल करणार आहेत. 

Continues below advertisement

गोपीचंद पडळकर काय म्हणाले? (Gopichand Padalkar Beed Jail)

दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बीडचे कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची तक्रार केली. पेट्रस गायकवाड यांनी धर्मांतर करण्याचं काम सुरू केल्याचाही आरोप पडळकर यांनी केला होता. आता त्या नंतर थेट कारागृहातील बंदिवान कैद्यांच्या लेखी तक्रारीने खळबळ उडवून दिली आहे.

बंदिवान कैद्याची पत्नी काय म्हणाली?

वसीम पठाण नावाचा कैदी जिल्हा कारागृहात होता. याच कैद्याला पेट्रस गायकवाड यांच्या कडून मुस्लिम धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारावा यासाठी दबाव आणला जात असल्याचा दावा कैद्याच्या पत्नीने केला आहे.

जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड पुढील कारणांमुळे चर्चेत- (Beed District Jail Petrus Gaikwad)

  1. जळगावात गायकवाड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. 
  2. बीडच्या जेलमध्ये वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट
  3. सतीश भोसले उर्फ खोक्याकडे आढळून आलेला गांजा
  4. कारागृह परिसरातील झाडांची अवैध कत्तल
  5. खाजगी गाडीची धुलाई कैद्याकडून करून घेणे 
  6. आता तर थेट कैद्यांचे धर्मांतर करण्याचा आरोप या कारणांमुळे पुन्हा एकदा पेट्रस गायकवाड वादाच्या भोवऱ्यात आहेत.

दक्षता समितीचे एक पथक देखील बीडच्या दिशेने रवाना- (Beed Crime News)

पेट्रस गायकवाड यांच्यावर अनेक गंभीर आरोप झालेत. मात्र गायकवाड यांनी अद्याप माध्यमांसमोर येऊन कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याही प्रकरणात आमच्या प्रतिनिधीने कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी याबाबत बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला. या प्रकरणाची गंभीर दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतल्याचे समजते. यासंदर्भात दक्षता समितीचे एक पथक देखील बीडच्या दिशेने रवाना झाल्याची सूत्राची माहिती आहे.

संबंधित बातमी:

संताप! बीड जिल्हा पुन्हा हादरला, परळीत 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून लैंगिक अत्याचार; 8 दिवसातील दुसरी घटना