बीड : माझे पती आत्महत्या करूच शकत नाही, त्यामुळे या प्रकरणाचा योग्य तपास करून आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी मयत जीएसटी अधिकारी सचिन जाधव (Sachin Jadhavar) यांच्या पत्नी मयुरी जाधवर (Mayri Jadhavar) यांनी केली. धुळे-सोलापूर मार्गावर सचिन जाधवर यांचा मृतदेह त्यांच्या कारमध्ये आढळला होता. त्यावेळी त्या कारमध्ये मडके आणि कोयताही सापडल्याने त्यांच्या मृत्यूचं गुढ वाढलं आहे. 

मयत जीएसटी अधिकारी सचिन जाधववर यांच्या पत्नीने मोठा दावा केला आहे. आठ दिवसांपासून माझ्या पतीला मानसिक त्रास दिला जात होता. त्यांच्या कारमध्ये सुसाईड नोट सापडल्याचे सांगितले जाते. मात्र ती आम्हाला दाखवण्यात आलेली नाही. ती सुसाईड नोट आम्हाला दाखवावी तसेच दोषी अधिकाऱ्याचे नाव समोर येत आहे, त्याला थेट शिक्षा व्हावी अशी मागणी मयत सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी केली आहे. 

माझे पती आत्महत्या करूच शकत नाहीत, असा ठाम दावा करत त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. गेल्या काही दिवसापूर्वी त्यांच्या पतीचा धुळे-सोलापूर महामार्गालगत पाली जवळ मृतदेह आढळला होता. माझी फिर्याद नोंदवून आरोपीला तात्काळ अटक करावी, अशीही मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

Sachin Jadhavar Suicide Case : काय घडला होता प्रकार? 

सचिन जाधवर हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील चुंब या गावचे रहिवाशी आहेत. ते 2012 च्या एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिले आले होते. मागील काही वर्षांत ते बीडच्या जीएसटी कार्यालयात सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी राहत्या घरातून बाहेर पडलेले सचिन जाधवर शनिवार पर्यंत घरी पोहोचले नव्हते. त्यामुळे त्यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. 

पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे जाधवर यांचा शोध घेतला असता बीड जवळील कपिलधारवाडी परिसरात त्यांचा मृतदेहच गाडीत संशयास्पदरित्या आढळून आला. बंद कारमध्ये मडक्यात कोळसा आणि लाकूड जाळून धूर केल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास आलं.

या प्रकरणात घातपाताचा संशय आल्याने पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकाराचा तपास सुरू केला. शवविच्छेदना दरम्यान, जाधवर यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळली आणि यात आत्महत्येचं कारण वरिष्ठाच्या त्रासाचे नमूद करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी एका अधिकाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. उपलब्ध झालेल्या पुराव्यानुसार पुढील कारवाई सुरू असल्याचं बीड पोलिसांनी सांगितलं.

सर्वांशी मनमिळावू असलेले जाधवर यांच्या मृत्यूचे गूढ संशयास्पद आहे. त्यामुळे या सर्व घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

ही बातमी वाचा: