बीड: मस्साजोग गावचे सरपंच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराड (Walmik Karad) याच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले (Sudarshan Ghule),प्रतीक घुले आणि त्याच्या साथीदारांनी कारागृहात आम्हाला मारहाण केल्याची तक्रार महादेव गित्ते (Mahadev Gitte),राजेश वाघमोडे यांनी कारागृह अधीक्षक यांच्याकडे केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महादेव गित्ते यांनी कारागृह अधीक्षकांकडे केली आहे.
महादेव गीतेने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी आणि माझे सहकारी 31 मार्च रोजी सकाळी बाहेर पडलो. यावेळी वाल्मीक यांच्या सांगण्यावरून सुदीप सोनवणे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, रघुनाथ फड,बालाजी दहिफळे, हैदर अली, लईक अली,योगेश मुंडे,जगन्नाथ फड व त्याच्या साथीदारांनी आमच्यावर हल्ला केला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद आहे, हे तपासून गुन्हा दाखल करावा असे म्हटले आहे.
वाल्मीक कराड,सुदर्शन घुले व प्रतीक घुले आणि त्यांचे साथीदार हे बीडच्या कारागृहात आहेत. तर परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणातील बबन गीते गँगमधील महादेव गीते आणि त्याचे साथीदारही याच कारागृहात होते. 31 मार्च रोजी या सर्वांना फोन लावण्यासाठी बॅरॅकमधून बाहेर काढण्यात आले.यावेळी कराड आणि गित्ते गँगमध्ये शाब्दिक चकमक होऊन हाणामारी झाली होती.
परंतु कारागृह प्रशासनाने कराडचा काहीच संबंध नसल्याचे सांगत राजेश वाघमोडे आणि सुदीप सोनवणे यांच्यात वाद झाल्याचा दावा करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याच दिवशी महादेव गित्ते आणि दुसऱ्या दिवशी बीडमधील आठवले गँगला इतरत्र जेलमध्ये हलवण्यात आले. परंतु आता महादेव गित्ते याच्या तक्रारीमुळे कारागृहात गित्ते आणि कराड गँगमध्ये राडा झाला होता, हे सिद्ध झाले आहे.
पोलिसांचा दावा काय?
बीडच्या जेलमध्ये सकाळी नाश्त्याच्या वेळी बंदी उठवली जाते. या काळात तुरुंगातील कैद्यांना बराकीतून बाहेर सोडले जाते. त्याचवेळी ही मारामारी झाल्याचे वृत्त आहे. सुरुवातीला महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मिक कराड याला चोपल्याची माहिती समोर आली होती. मात्र, पोलिसांनी हे वृत्त फेटाळून लावले होते. सोमवारी महादेव गीतेच्या हत्येच्या प्रयत्नातील आरोपी सुदीप सोनवणे व बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी राजेश वाघमोडे यांच्यात हाणामारी झाली, असे तुरुंग प्रशासनाने म्हटले होते. परंतु, हा वाद सुदीप सोनावणे आणि राजेश वाघमोडे यांच्यात झाला होता तर मग बीड पोलिसांनी महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांना इतरत्र का हलवले, असा सवाल उपस्थित झाला होता. त्यामुळे बीड पोलीस दल पुन्हा एकदा संशयाच्या फेऱ्यात सापडले होते.
आणखी वाचा