बीड : दीड लाख रुपये परत देण्यासाठी मुकादमाने तगादा लावल्याने ऊस तोडणी कामगार आणि ट्रॅक्टर चालकाने त्याचा खून केला. एवढंच नाही तर पाण्यात बुडून मुकादमाचा मृत्यू झाल्याचा बनाव देखील त्यांनी रचला होता. या प्रकरणी अंमळनेर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. बबन शिंदे आणि सोनाजी पाचे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. तर बबन नारायण सुतार असं मृत मुकादमाचं नाव आहे. 

 

ऊस तोडणी कामगार आणि ट्रॅक्टर चालकाने बीडच्या एका मुकादमाकडून दीड लाख रुपये घेतले होते. पैसे घेऊनही हे दोघे ऊसतोडणीसाठी गेले नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून मुकादमाने त्यांच्याकडे पैसे परत द्या असा तगादा लावला होता आणि हाच राग मनात धरुन ऊस तोडणी कामगार आणि ट्रॅक्टर चालकाने मिळून मुकादमाचा खून केला. 

 

बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील बबन नारायण सुतार (वय 55 वर्ष) हे मुकादम म्हणून काम करतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्रॅक्टरवर असलेला चालक बबन शिंदे आणि सोनाजी पाचे या दोघांना मिळून ऊस तोडणीसाठी दीड लाख रुपये दिले होते. पैसे देऊनही हे दोघेजण ऊस तोडणीसाठी न आल्याने नारायण सुतार यांनी त्यांच्याकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला आणि हाच राग मनात धरुन बबन शिंदे आणि सोनाजी पाचे यांनी नारायण सुतार यांचा खून करण्याचं ठरवलं.

 

13 जून रोजी सकाळी ऊसतोड कामगार सोनाजी पाच आणि ट्रॅक्टर चालक बबन शिंदे हे दोघेही धोंडा येथील नारायण सुतार यांच्या घरी आले आणि आपल्याला दारु सोडण्यासाठी पाटोदा तालुक्यातील वरझडी या ठिकाणी जायचं असं सांगून त्यांना आपल्या दुचाकीवर बसून ते पाटोद्याच्या दिशेने निघाले. मात्र वाटेतच अचानक या दोघांनी डोंगरकिन्ही गावाजवळ जवळ असलेल्या भाटेवाडी तलावाजवळ आपली दुचाकी उभी केली आणि नारायण सुतार यांचा खून करुन त्यांचा मृतदेह एका तलावात टाकला. यानंतर नारायण यांच्या पत्नीला फोन करुन त्यांचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती दिली.

 

या सर्व प्रकरणानंतर अंमळनेरचे पोलीस घटनास्थळावर पोहोचले आणि त्यांनी पंचनामा करुन नारायण सुतार यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी नारायण सुतार यांना पोहता येत असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिली. पोलिसांना बबन शिंदे आणि सोनाजी पाचे यांच्यावर संशय आला पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता दीड लाख रुपयांसाठी तगादा लावण्याने नारायण सुतार यांचा खून केल्याची कबुली या दोघांनी दिली आहे.

 

नारायण सुतार यांच्या खूनप्रकरणी त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून बीडच्या अमळनेर पोलीस ठाण्यात सोनाजी पाचशे आणि बबन शिंदे या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे