बीड: केज तालुक्यात महामार्गावर जॅक ठेवून वाहचालकांना मारहाण करत लुटल्याच्या लागोपाठ दोन घटना घडल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेने तपासचक्रे फिरवून मामा-भाच्याच्या टोळीचा पर्दाफाश करत पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्यांना केज पोलिसांच्या स्वाधीन केले. सचिन शिवाजी काळे, पापा ऊर्फ काळ्या ऊर्फ आकाश बापू शिंदे, रामा लाला शिंदे, दादा सरदार शिंदे व विकास ऊर्फ बाबा ज्ञानोबा पवार अशी आरोपींची नावे आहेत.


बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ज्या दरोडेखोरांना ताब्यात घेतला आहे. त्यांच्याकडून आणखी दरोड्याची माहिती मिळण्याची शक्यता आहे. या पाच जणांची कसून चौकशी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी पकडलेल्या दादा शिंदे व सचिन काळे हे नात्याने मामा-भाचे आहेत. ते दोघे टोळीप्रमुख आहेत. वाहनचालकांना लुटण्यासाठी महामार्गावर जॅक ठेवायचा, वाहन थांबून चालक जॅक घेण्यासाठी खाली उतरताच त्याच्यावर हल्ला चढवून लूट करायची, अशी शक्कल चोरट्यांनी लढवली होती.


रस्त्यात जॅक ठेवून थांबवायचे गाडी 
या दरोडेखोराच्या टोळीने 7 मे रोजी सारणी सांगवी (ता. केज) पाटीजवळ पहाटे चार वाजता जॅक ठेवून त्यांनी कारचालक विश्वनाथअप्पा उरकुंडे (रा. निवाडा, जि. लातूर) यांना मारहाण करत रोख 49 हजार रुपये व 25 हजार रुपयांचे दागिने बळजबरीने हिसकावले होते. यावरून केज ठाण्यात दरोड्याचा गुन्हा नोंद झाला होता. दुसरी घटना 23 मे रोजी पहाटे दोन वाजता मस्साजोग शिवारात जॅक ठेवून ट्रकचालक गोविंद निवृत्ती कुंटे व महेश ज्ञानोबा मलवाड (दोघे रा. नांदूर बु., ता. अहमदपूर, जि. लातूर) यांनादेखील जॅकचे आमिष दाखवून मारहाण केली होती. चाकूच्या धाकावर रोख रक्कम व दोन मोबाईल लंपास केले होते.


एक सारख्या पद्धतीने लोकांना लुटणारी टोळी कार्यरत झाली होती याच टोळी कडून 15 दिवसांत दोन घटना घडल्याने वाहनचालकांत भीतीचे वातावरण होते, शिवाय पोलिसांपुढे आव्हान होते. 27 रोजी रात्री पाच जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. सुरुवातीला त्यांनी आढेवेढे घेतले, पण खाक्या दाखविल्यावर दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली.