Beed Crime News: बीड (Beed) जिल्ह्यातील कपिलधार येथे बालविवाहाचा (Child marriage) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संयुक्त कारवाई केली. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचल्याचे लक्षात येताच नवरदेवाने थेट विवाह मंडपातून पलायन केल्याचा प्रकार घडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Beed Crime News)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कपिलधार येथील एका मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलीचा विवाह सोहळा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बीड ग्रामीण पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत विवाहाची विधी पूर्ण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Beed Crime News: नवरदेव सैरावैरा धावत सुटला
पोलीस पथक घटनास्थळी पोहोचताच परिस्थिती बिघडली. पोलिसांना पाहताच नवरदेवाने कोणालाही काही न सांगता थेट मंडपातून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार उपस्थितांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला असून, तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Beed Crime News: 100 जणांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. वधू-वराचे आई-वडील, जवळचे नातेवाईक, वराडी मंडळी तसेच कपिलधार देवस्थानचे विश्वस्त अशा एकूण सुमारे 100 जणांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed Crime News: बीडमध्ये बालविवाहाचे प्रमाण अधिक
बीड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे वारंवार समोर येत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करत असतानाही असे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या नवरदेवाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून, अशा प्रकारांना कोणतीही सहानुभूती न देता कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
