Beed Ex deputy sarpanch suicide: बीडमधील गेवराई तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने मंगळवारी डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सोलापुरातल्या बार्शी (Barshi News) तालुक्यातील सासुर या गावात एका कारमध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय 34) यांचा मृतदेह आढळून आला. ते लुखामसाला गावचे माजी उपसरपंच होते. लुखामसला येथे त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. ते कला केंद्रातील (Kala Kendra Dancer) पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमात वेडे झाले होते. पूजा गायकवाड गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी बोलत नव्हती. त्यामुळे गोविंद बर्गे (Govind Barge Suicide) यांना काहीच सुचेनासे झाले होते, त्यांचे चित्त थाऱ्यावर नव्हते. अखेर सोमवारी रात्री ते पूजाच्या घरी गेले होते. मात्र, त्याठिकाणी अपेक्षित गोष्टी न घडल्याने गोविंद बर्गे यांनी याच नर्तिकेच्या घरासमोर कारमध्ये स्वत:च्या कानशि‍लात गोळी झाडून आत्महत्या (Suicide news) केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला. सकृतदर्शनी हे प्रकरण आत्महत्येचे वाटत असले तरी पोलीस गोविंद बर्गे यांच्यासोबत घातपात झाला का, ही शक्यताही पडताळून पाहत आहेत. गोविंद बर्गे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.

Continues below advertisement


गोविंद बर्गे यांना कलाकेंद्रात जाण्याचा नाद होता. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडीतांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली. कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. या दोघांचे प्रेमाचे नाते घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाकले होते. तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा, असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता. आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही पूजाने गोविंद बर्गे यांना दिल्याचे समजते. या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड तणावात होते. 


गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते. मात्र, ती त्यांचा फोन उचलत नव्हती, त्यांच्याशी एक शब्दही बोलत नव्हती. सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिचं सासुरे येथील घरी आले होते. याठिकाणी दोघांमध्ये नेमके काय झाले, हे माहिती नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह मिळाला. कारचा दरवाजा लॉक करण्यात आला होता. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर गोविंद बर्गे यांचा मृतदेह होता. त्यांनी डोक्याच्या उजव्या भागात कानशि‍लात गोळी झाडून घेतली होती. 


Solapur Crime news: गोविंद बर्गे यांचं कुटुंब वाऱ्यावर


गोविंद बर्गे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. गोविंद बर्गे यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांची मुलगी नववीत शिकते. तर लहान मुलगा सहावीत शिकत आहे. गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. यानंतर पोलिसांनी 21 वर्षांच्या नर्तिका पूजा गायकवाड हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. 



आणखी वाचा


पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोनं घेतलं, नंतर म्हणाली बंगला नावावर करा, नर्तिकेच्या नादापायी सोलापुरातील माजी उपसरपंचाने आयुष्य संपवलं