(Source: ECI | ABP NEWS)
4 लाखांचा हुंडा दिला तरी आणखी 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ, अंबाजोगाईत वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती
सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली आहे. बाहेरून चार लाख मिळाल्यानंतरही आणखी दोन लाख आणून दे अशी मागणी सासरचे लोक करत होते.

Beed: बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील गीता या गावातील शुभांगी संतोष शिंदे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय.सासरच्या मंडळींनी छळ केल्याचा आरोप आता माहेरच्या लोकांनी केला असून यापूर्वी आपण चार लाख रुपये दिले होते. यानंतरही दोन लाख आण म्हणून छळ सुरू होता असा दावा नातेवाईकांनी केलाय. दरम्यान शुभांगी शिंदेंचा मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आणण्यात आला असून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभरातून हुंडा प्रकरणातून सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून केलेल्या अनेक घटना समोर आल्या. दरम्यान बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील गीता गावामध्ये विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली आहे. बाहेरून चार लाख मिळाल्यानंतरही आणखी दोन लाख आणून दे अशी मागणी सासरचे लोक करत होते.
नेमकं घडलं काय?
अंबाजोगाई तालुक्यातील गीता गावात शुभांगी संतोष शिंदे या 25 वर्षीय विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. शुभांगीला यापूर्वी चार लाख रुपये हुंडा दिला गेला होता, पण तरीही सासरच्यांनी आणखी दोन लाखांची मागणी करत मानसिक त्रास दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. शुभांगीचे पती संतोष शिंदे व इतर सासरच्या मंडळींनी सातत्याने पैसे मागणी करून छळ केल्याचा दावा मयत युवतीच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. आम्ही चार लाख आधीच दिले, तरीही दोन लाख आण म्हणून धमक्या देत होते,असं विवाहितेच्या नातेवाईकांनी सांगितलं.
तिचा भाऊ रामेश्वर सोळंकेसह वडिलांनीहीआपल्या मुलीचा मृत्यू सासरच्या त्रासामुळेच झाल्याचा आरोप केलाय. मृतदेह सध्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात ठेवण्यात आला असून, नातेवाईकांनी गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी हालचाली सुरू आहेत. या प्रकरणामुळे गीता गावात हळहळ व्यक्त होत असून, सासरच्या त्रासामुळे आणखी एका विवाहितेचा जीव गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मृत महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे.
हेही वाचा:
13 गंभीर गुन्हे, 3 मकोका, माजी आमदाराचे मावस भाऊ; सुनेला छळणारे पुण्यातील गायकवाड पिता-पुत्र कोण?
























