वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
बीड जिल्हा कारागृहात मोबाईल उपलब्ध करून देण्यात प्रशासनातील काही घटकांचा सहभाग असल्याचा दावा करत खा.सोनवणे यांनी बीड पोलीस अधीक्षकांना पत्र दिलंय.

Beed: विलास घुले खून प्रकरणात (Vilas Ghule Case) सौरव सोनवणेंना अडकवण्याचा पूर्वनियोजित कट बीड जिल्हा कारागृहातुन रचल्याची वाल्मिक कराड आणि त्याचा साथीदार सुग्रीव कराडची कॉल रेकॉर्डिंग खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawne) यांनी समोर आणली होती. बीड जिल्हा कारागृहात मोबाईल उपलब्ध करून देण्यात प्रशासनातील काही घटकांचा सहभाग असल्याचा दावा करत खा.सोनवणे यांनी बीड पोलीस अधीक्षकांना पत्र दिलंय.
दरम्यान, गेल्या जवळपास वर्षभरापासून बीड जिल्हा कारागृह चर्चेत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह अन्य आरोपी या कारागृहात बंदिस्त आहेत. त्यामुळे हे कारागृह अतिसंवेदनशील आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी यापूर्वी कारागृहातील कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार केली होती. दरम्यान खा. सोनावणेंच्या ऑडीओ क्लिप प्रकरणानंतर पुन्हा एकदा बीड कारागृहातील सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
सुग्रीव कराडसह कारागृह प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
दोन समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करून बीड जिल्हा प्रशासन व पोलिसांना वेठीस धरण्याचा हा सुनियोजित कट असल्याचा पत्रात उल्लेख आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाल्मीक कराड, सुग्रीव कराड, रमेश घुले आणि कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.खासदार सोनवणे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रावर काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
जिल्हा कारागृहात कैद्याकडून बेकायदेशीर मोबाईल संपर्काचा वापर, बाहेरील व्यक्तींशी संपर्क तसेच कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्राप्त झालेल्या गंभीर तक्रारींची स्वतंत्र, निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यापूर्वीही खासदार बजरंग सोनवणे यांनी केली होती. मात्र या पत्रावर आजपर्यंत नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, चौकशी कोणी केली, त्याचा अहवाल काय आहे आणि दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत मला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असं खा. सोनवणे म्हणाले होते.
बीड जिल्हा कारागृहाची सात तास झडती, कसून चौकशी
विलास घुले खून प्रकरणात माझ्या मुलाला अडकवण्याचा कट वाल्मिक कराड याने कारागृहातून रचल्याचा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत केला.इतकंच नाहीतर एक ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवल्यानंतर खळबळ उडाली. या सर्व प्रकारानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाचे कारागृह उप महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या पथकाने 3 ऑक्टोबर रोजी बीड कारागृहाची सात तास झडती घेतली. विशेष बाब म्हणजे, डीआयजी योगेश देसाई यांनी चौकशी करताना कारागृहातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना बाजूला ठेवल्याची माहिती होती.





















