Beed Crime : बीड पुन्हा हादरलं! आधी युवकाला भोसकून संपवलं, नंतर कोयत्यासह आरोपी पोलीस ठाण्यात, महिन्याभरातील तिसरी धक्कादायक घटना
Beed Crime : बीड जिल्ह्यात महिन्याभरात तिसरी हत्या झाली असून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Beed Crime : बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. या हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारीचे अनेक प्रकरणे समोर येत आहे. आता बीडच्या (Beed Crime News) माजलगाव येथे एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर हत्येनंतर आरोपी स्वतः कोयत्यासह पोलीस ठाण्यात (Police Station) दाखल झाल्याने बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यात महिन्याभरात तिसरी हत्या झाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव येथे बाबासाहेब प्रभाकर आगे याच्यावर आरोपी नारायण फपाळ याने बाजार रोड परिसरात धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात बाबासाहेब प्रभाकर आगे याचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत हा किट्टी आडगाव येथील रहिवासी असून भाजपचा बूथ विस्तारक म्हणून देखील काम पाहत असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी कोयत्यासह पोलीस ठाण्यात हजर
बाबासाहेब आगे याची हत्या केल्यानंतर आरोपी नारायण फपाळ कोयत्यासह पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाला. आरोपीने पोलिसांना हत्येबाबत कबुली दिली आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून या घटनेचा तपास माजलगाव पोलीस करत आहेत. दरम्यान, बीड जिल्ह्यात महिन्याभरात ही तिसरी हत्या झाली आहे. आधी सिरसाळा,नंतर अंबाजोगाई आणि आता माजलगाव झालेल्या हत्येमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस प्रशासन बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काय उपाययोजना राबवणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी तरुणाची दगडाने ठेचून हत्या
दरम्यान, बीडमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याच्या भावाने आणि भावजयने मिळून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केली होती. ही घटना बीडमधील परळी तालुक्यातील सिरसाळा परिसरातील कान्हापूर येथे घडली. मार्च 2023 मध्ये अविनाश देशमुख या तरुणाने आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येला स्वप्नील उर्फ बबलू देशमुख जबाबदार असल्याचा आरोप होत होता. या प्रकरणी स्वप्नील उर्फ बबलू देशमुखवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, अविनाश देशमुखच्या आत्महत्येप्रकरणी स्वप्नीलवर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्नील हा अविनाशच्या कुटुंबीयांवर दबाव टाकत होता. याच त्रासाला कंटाळून अविनाशचा भाऊ धनंजय देशमुख आणि भावजय सोनाली देशमुख यांनी स्वप्नीलची गळा चिरुन आणि दगडाने ठेचून हत्या केली होती.
अंबाजोगाईत दोघांनी कोयत्याने वार करत एकाला संपवलं
तर अंबाजोगाईतील पोखरी रोडवर एका तरुणावर दोघा जणांनी कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याची एक एप्रिल रोजी घडली होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजकुमार करडे असे मृत तरुणाचे नाव आहे. पोखरी रोडवरील सारडा नगरी जवळ दोन तरुणांनी राजकुमार करडेवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याच्या गळ्यावर, डोक्यात, पाठीवर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अतिरक्तस्त्रावामुळे राजकुमारचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता.
आणखी वाचा
























