Bakri Eid 2026: बकरी ईदच्या (Bakri Eid) पार्श्वभूमीवर मुंबई आणि लगतच्या मिरा रोड परिसरात राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. मिरा रोड येथील एका हाउसिंग सोसायटीत बकरे आणण्यावरून रात्री जोरदार गदारोळ झाला, ज्याचे पर्यवसान हिंसाचारात होऊन एका युवकावर ब्लेडने वार करण्यात आले. दुसरीकडे, मुंबईतील सोसायट्यांमध्ये होणाऱ्या संभाव्य बेकायदेशीर कुर्बानीच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने (BJP) आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला पत्र लिहिले आहे.

Bakri Eid 2026: मिरा रोडच्या पूनम इस्टेटमध्ये मध्यरात्री गदारोळ

मिरा रोड येथील पूनम इस्टेट क्लस्टर-1 कॉम्प्लेक्समधील (Poonam Estate Cluster-1 Complex) एका सोसायटीत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जवळपास 25 बकरे आणून एक शेड (Shed) तयार करण्यात आल्याने वादाला तोंड फुटले. ईदपर्यंत हे बकरे सोसायटीत ठेवण्यासाठी तात्पुरती परवानगी (Temporary Permission) मागितल्याचे सोसायटीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र, सोसायटीतील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत बैठक (Official Meeting) न घेता ही शेड उभारण्याची परवानगी दिल्याचा आरोप हिंदू रहिवाशांनी केला आहे.

या बकऱ्यांमुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत रविवारी भाजपच्या स्थानिक नगरसेविका, हिंदू संघटनांचे पदाधिकारी आणि रहिवाशांनी काशिमीरा पोलीस ठाणे (Kashimira Police Station) आणि महापालिकेकडे तक्रार (Complaint) दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पालिकेने तात्काळ ती शेड तोडली. मात्र, शेड तोडल्यानंतरही बकरे सोसायटी परिसरातच असल्याने रात्रीच्या वेळी तणाव आणखी वाढला. या गदारोळात एका अज्ञाताने एका युवकावर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या घटनास्थळी लक्ष ठेवून आहेत. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, "सोसायटीत कुर्बानी देण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, केवळ ईदपर्यंत बकरे ठेवण्याची तात्पुरती व्यवस्था केली आहे."

Bakri Eid 2026: मुंबईत भाजप नेत्यांचे प्रशासनाला पत्र

मिरा रोडमधील या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही भाजपने या मुद्द्यावरून प्रशासनावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील हाउसिंग सोसायट्यांमध्ये नियमबाह्य पद्धतीने होणाऱ्या कुर्बानी रोखण्यासाठी भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबई पोलिसांना (Mumbai Police) पत्र पाठवले आहे. हाउसिंग कॉम्प्लेक्समध्ये कोणतीही बेकायदेशीर कुर्बानी होऊ नये, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

या पत्रावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, भाजप गटनेते गणेश खनकर, मार्केट समिती अध्यक्षा हेतल गाला, आमदार मिहीर कोटेचा, आमदार अतुल भातखळकर, आमदार मनीषा चौधरी, माजी खासदार मनोज कोटक, आमदार पराग शाह आणि आमदार संजय उपाध्याय यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनीही या मागणीला पाठिंबा दिला असून, "सोसायटी परिसरात नियमबाह्य पद्धतीने कुर्बानी होऊ नये आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी," अशी मागणी केली आहे. बकरी ईदच्या तोंडावर या पत्रामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा 

Pune Crime News: आंदेकर टोळीच्या म्होरक्यांवर कारागृहात 'लॉकडाऊन'; गुन्हेगारी रोखण्यासाठी सीपी अमितेश कुमारांचं मोठं पाऊल