बीड: संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड आणि आरोपी सुदर्शन घुले यांना बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. बबन गिते समर्थक महादेव गिते (Mahadev Gite) आणि त्याचा साथीदार अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराडच्या अंगावर हात टाकल्याचे समजते. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी नाश्त्याची वेळ असल्याने कैद्यांवरील बंदी उठवण्यात आल्याने ते मोकळे फिरत होते. तेव्हा महादेव गिते आणि अक्षय आठवले हे दोघे वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी बाजूलाच असणारा सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) हा मध्ये पडला. मात्र, या दोघांनाही महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी चोप दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Continues below advertisement

मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे खून प्रकरणात बबन गिते हा गेल्या काही महिन्यांपासून फरार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बबन गिते याने शरद पवार गटात प्रवेश केला होता. एकेकाळी बबन गिते हा धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक मानला जायचा. मात्र, त्याने प्रचंड शक्तीप्रदर्शन करत शरद पवार गटात प्रवेश केला होता. यानंतर बीडमधील राजकीय समीकरणे बदलली होती. परंतु, नंतरच्या काळात बापू आंधळे खून प्रकरणामुळे बबन गिते हा फरार झाला होता. तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्याची प्रक्रियाही मंदावली होती. मात्र, आता बीड जिल्हा कारागृहातील हाणामारीमुळे बबन गिते पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Continues below advertisement

वाल्मिक कराड याला तुरुंगात झालेल्या मारहाणीनंतर शशिकांत उर्फ बबन गिते याची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे.  'अंदर मारना या मरना सबकुछ माफ है', असा मजकूर या पोस्टमध्ये लिहला आहे. काही दिवसांपूर्वी महादेव गिते याच्या वाढदिवसाच्या दिवशीही बबन गिते याच्याकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. यामध्ये बबन गिते याने म्हटले होते की, हॅपी बर्थडे महादेव गिते, "तुम तिलक हो हमारे माथे का", असे म्हटले होते. हे बबन गिते याचे अधिकृत अकाऊंट आहे की नाही, याबाबत खात्री नाही. मात्र, या अकाऊंटला फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. त्यामुळे ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बापू आंधळे खून  प्रकरणात बबन गित्ते गेल्या 9 महिन्यांपासून फरार आहे. तो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतो मात्र पोलिसांच्या हाती लागत नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

आणखी वाचा

गिते गँगने जेलमध्ये वाल्मिक कराड अन् सुदर्शन घुलेला घेरलं, तुंबळ हाणामारी, बीड जिल्हा कारागृहात नेमकं काय घडलं?