डोंबिवली : दिव्यांग इसम घरात एकटा असल्याची संधी साधत त्याच्या घरात घुसून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या त्रिकुटाचा प्रयत्न या इसमाच्या मुलीने मोठ्या धाडसाने उधळून लावल्याची थरारक घटना डोंबिवली पश्चिम गुप्ते रोड परिसरात घडली. दरम्यान या चोरट्यांनी घरातील अडीच हजार रुपयांची रोकड व एक मोबाईल लंपास केला. मात्र तरुणीच्या धाडसामुळे आणखी काही त्यांच्या हाती लागले नाही.


भरवस्तीत ऐन सायंकाळी गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याच दरम्यान चोरट्याचा मोबाईल याच घरात पडल्याने या मोबाईलद्वारे चोरट्याचा माग काढत पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली. त्यांची साथीदार एक महिला आरोपी फरार असून तिचा पोलीस शोध घेत आहेत. तर या तिघांमधील एक आरोपी याच इमारतीमध्ये राहत असून त्याने चोरीचा डाव आखल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. चेतन मकवना ,अब्दुल शेख, दिनेश रावल असे तिघा आरोपींची नावे आहेत


डोंबिवली पश्चिमेकडील गुप्ते रोड सुरजमणी इमारतीत अशोक गोरी राहतात. दिव्यांग असलेल्या गोरी यांची पत्नी आणि मुलगी मंगळवारी 5 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडल्या. गोरी घरात एकटेच असल्याची संधी साधत दबा धरून बसलेल्या 3 दरोडेखोर त्यांच्या घरात घुसले. विशेष म्हणजे या त्रिकुटात एक महिला होती .पाठमोऱ्या बसलेल्या गोरी यांना काही समजण्याच्या आतच त्यानी चाकूचा धाक दाखवत हात बांधून त्यांच्या तोंडावर पट्टी चिकटवली. याच दरम्यान गोरी यांची मुलगी इतक्यात घरात आली. मात्र दरोडेखोरांनी दरवाजातच तिला पकडून तिच्या तोंडाला पट्टी बांधून तिचे हात बांधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने प्रसंगावधान राखत मोठया धाडसाने प्रतिकार करत आरडाओरडा केला. आवाजाने शेजारी धावत आल्याने दरोडेखोरांचा डाव फसला. पकडले जाण्याच्या भीतीने त्यानी हाताला लागलेली अडीच हजार रुपयांची रोकड व एक मोबाईल चोरून पळ काढला. मात्र मुलीबरोबर झालेल्या झटापटीत चोरट्यांच्या हातातून त्याचाच मोबाईल खाली पडला.


या प्रकरणी गोरी कुटुंबीयांनी विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत हा फोन त्याच्या ताब्यात दिला.पोलिसांनी तत्काळ या मोबाईलच्या मदतीने माग काढत ठाण्यातून चेतन मकवनाया आरोपीला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार गोरी यांच्या इमारतीत राहणाऱ्या दिनेश रावल या तरुणाने हा चोरीचा आखल्याचे उघड झाले पोलीसांनी त्याला देखील अटक केली आहे. त्याचा साथीदार अब्दुल शेख यालाही अटक केली तर यांची एक साथीदार महिला मात्र फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.