Ashok Kharat Wife Kalpana Kharat: कल्पना खरात 10 दिवसांपासून फरार, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, खरातच्या पत्नीच्या मैत्रिणींची केली चौकशी, काय समोर आलं?
Ashok Kharat Wife Kalpana Kharat: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातनंतर आता त्याची पत्नी कल्पना खरातचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाने (SIT) कंबर कसली आहे.

Ashok Kharat Wife Kalpana Kharat: नाशिकचा बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अटकेनंतर आता त्याच्या पत्नीचा, म्हणजेच कल्पना खरातचा (Kalpana Kharat) शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाने (SIT) कंबर कसली आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात नाशिकमधील (Nashik) राहत्या घरून फरार झाली आहे. 10 दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती ठोस काहीही लागले नसल्याने, आता तपास यंत्रणेने तिचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि घरगुती नोकरांकडे तपासाचा मोर्चा वळवला आहे.
Ashok Kharat Wife Kalpana Kharat: मैत्रिणी आणि नोकरांची चौकशी
मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीच्या पथकाने कल्पना खरातच्या नाशिकमधील काही जवळच्या मैत्रिणींची चौकशी केली आहे. तसेच, खरातच्या घरी सध्या काम करणारे आणि यापूर्वी काम सोडून गेलेल्या नोकरांकडूनही माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कल्पना नेमकी कोणाच्या संपर्कात होती किंवा ती कुठे आश्रय घेऊ शकते? या दिशेने पोलीस तपास करत आहेत.
Ashok Kharat Wife Kalpana Kharat: माहेरच्यांकडून धक्कादायक माहिती
तपासासाठी पोलीस कल्पनाचे माहेर असलेल्या सिन्नर तालुक्यातील पाडळी येथे पोहोचले होते. मात्र, तिथे गेल्यावर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना गेल्या 16 वर्षांपासून आपल्या माहेरच्या लोकांशी अजिबात संपर्कात नाही. "अशोक खरात तिला कधीही माहेरी भेटायला येऊ देत नव्हता," असा खळबळजनक खुलासा तिच्या भावांनी आणि नातेवाईकांनी केला आहे. तिचे माहेरचे लोक अत्यंत सामान्य असून ते तुटपुंज्या शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात.
Ashok Kharat Wife Kalpana Kharat: लूकआऊट नोटीस जारी
कल्पना खरातने शिर्डीत एका शेतकऱ्याची जमीन खरेदी प्रकरणात मोठी फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पैशांचे व्यवहार कल्पनाच्या भावांच्या खात्यातून झाल्याचेही तपासात समोर आले होते. त्यामुळे एसआयटीने काही दिवसांपूर्वी अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन आणि कल्पनाच्या दोन भावांची चौकशी केली होती. ती देशाबाहेर पळून जाऊ नये, यासाठी पोलिसांनी तिच्याविरोधात 'लूकआऊट नोटीस' जारी करण्यात आली आहे.
Who is Kalpana Kharat: कोण आहे ही कल्पना खरात?
कल्पना खरातचे मूळ नाव सुनीता शिंदे आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाडळी हे तिचे जन्मगाव. तिचे प्राथमिक शिक्षण पाडळी गावात सातवीपर्यंत झाले, तर माध्यमिक शिक्षण ठाणगाव येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात झाले. 1993 साली तिचा विवाह अशोक खरातशी झाला आणि सुनीता शिंदेची 'कल्पना खरात' झाली. दोन मुली आणि एक मुलगा असा तिचा परिवार असून, अशोक खरातच्या काळ्या साम्राज्यात तिची मोठी भागीदारी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
आणखी वाचा





















