Ashok Kharat Nashik Crime News: महिला अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या (Ashok Kharat) आर्थिक कारभाराबाबत नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. मिरगाव येथील ‘श्री शिवनिका संस्थान’च्या संपत्तीत गेल्या काही वर्षांत तब्बल 74 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे निदर्शनास आले असून, एकेकाळी आर्थिक अडचणीत असलेल्या या ट्रस्टची कोट्यवधींची उलाढाल कशी झाली? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: ऑडिट रिपोर्टमधून उघड झालेले तपशील
उपलब्ध ऑडिट अहवालानुसार, 2022 ते 2022 दरम्यान संस्थानचे उत्पन्न केवळ 4.90 लाखांच्या घरात होते. इतकेच नव्हे, तर या काळात 1.60 ते 1.64 लाख रुपयांची तूटही नोंदवण्यात आली होती. मात्र, 2024 नंतर अचानक चित्र पालटले आणि उत्पन्नात झपाट्याने वाढ झाली.
2024 नंतर संस्थानचे उत्पन्न थेट 76 लाख 91 हजार 416 रुपयांपर्यंत पोहोचले. खर्च वजा जाता तब्बल 70.66 लाख रुपयांची विक्रमी शिल्लक ट्रस्टच्या खात्यात राहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संस्थानची आर्थिक स्थिती इतक्या झपाट्याने कशी मजबूत झाली? यावर संशय व्यक्त केला जात आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: मालमत्तेत मोठी झेप
संस्थानच्या मालमत्तेच्या आकडेवारीतही लक्षणीय वाढ दिसून येते. 2022 मध्ये 96 लाख रुपये असलेली मालमत्ता 2025 पर्यंत वाढून 1 कोटी 81 लाखांवर पोहोचली आहे. याशिवाय, बँकेत 23 लाख 35 हजार रुपयांच्या मुदत ठेवी असल्याचेही समोर आले आहे. या आकडेवारीमुळे देणग्यांचा स्रोत, निधीचे व्यवहार आणि आर्थिक उलाढाली यांचा तपास आता केंद्रस्थानी आला आहे. कोणत्या देणगीदारांनी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिला? याचाही शोध घेतला जात आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: 2010 मध्ये इशान्येश्वर मंदिराची स्थापना
अशोक खरातने 2010 मध्ये इशान्येश्वर मंदिराची स्थापना केली होती. त्याआधी ट्रस्ट स्थापन करताना ट्रस्टींना CBSE शाळा, UPSC-MPSC विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, गोशाळा आणि वेदशाळा उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ही आश्वासने पूर्ण झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. याचबरोबर, खरातचे इतर वादग्रस्त कारनामे उघडकीस येऊ लागल्यानंतर काही ट्रस्टींनी त्याच्यापासून अंतर ठेवल्याचेही समजते. महिलांवरील अत्याचार, फसवणूक आणि आता आर्थिक व्यवहारांतील संशयास्पद वाढ, या सर्व बाबींचा एकत्रित तपास सुरू असून, ‘शिवनिका संस्थान’च्या निधीचा स्रोत आणि वापर याचा सखोल तपास होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
