Ashok Kharat Nashik Crime: अशोक खरातचं डोकं दुखायचं थांबेना, पेनकिलरचाही फायदा नाही, वकिलांची कोर्टात महत्त्वाची मागणी
Ashok Kharat Nashik Crime: अशोक खरातचं डोकं ठणकायला लागलं, पेनकिलर घेऊनही फरक पडेना, वकिलांची कोर्टात महत्त्वाची मागणी. आज न्यायालयात काय घडलं?

Ashok Kharat Nashik Crime: दैवी चमत्काराच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिकमधील नराधम भोंदूबाबा अशोक खरात याचा तुरुंगातील मुक्काम दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशोक खरात (Ashok Kharat) याला न्यायालयाने रविवारी आणखी एका गुन्ह्यात पोलीस कोठडी सुनावली. महिला अत्याचाराच्या (Sexual Assault) पाचव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने (SIT) ताबा घेतल्यानंतर, खरातला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी अशोक खरातला 23 एप्रिलपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली. यावेळी अशोक खरातच्या वकिलांनी कोर्टात एक मागणी केली. (Maharashtra Crime news)
अशोक खरात याच्या वकिलांच्या मागणीनुसार, आरोपीच्या खांद्याचे ऑपरेशन झाले आहे, त्याचे डोकेही दुखत आहे. पेनकिलर गोळ्या, औषधांनी फारसा फरक पडत नाही. त्यामुळे अशोक खरात याला वैद्यकीय तपासणीवेळी न्यूरोसर्जनकडे घेऊन जावे. त्यासाठी नवीन अर्ज करण्याची गरज भासू नये, अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली. त्यावेळी न्यायाधीशांनी पोलिसांना आवश्यक ते औषधोपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अशोक खरात याच्याविरोधात अनेक महिलांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे एका प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या गुन्ह्यात त्याच्या पोलीस कोठडीची मागणी एसआयटीकडून केली जात आहे. एसआयटीकडून जवळपास प्रत्येक दिवशी अशोक खरात याची कसून चौकशी केली जात आहे. आज त्याला सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या (VC) माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिलांनी आरोपीच्या कोठडीची मागणी करताना महत्त्वाचे मुद्दे मांडले. "आरोपीची गुन्हे करण्याची पद्धत (Modus Operandi) एक असली तरी पीडित महिला वेगवेगळ्या आहेत. महिलांना गुंगीचे पदार्थ पाजून आणि फसवणूक करून त्याने अत्याचार केले आहेत. या द्रव्यांचा आणि गुन्ह्यामागच्या कटाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे," असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.
Ashok Kharat Court Hearing: अशोक खरातचे वकील कोर्टात काय म्हणाले?
अशोक खरात याच्या वकिलांनी कोठडीला विरोध करताना सांगितले की, पहिल्या कोठडीपासून सरकारी पक्ष तेच मुद्दे मांडत आहे. द्रव्य कुठून आणले आणि इतर बाबींचा तपास आधीच झाला असल्याने पुन्हा कोठडीची गरज नाही. मात्र, पीडितांची संख्या आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने कोठडी मंजूर केली. अशोक खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आणखी वाचा





















