Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. आर्थिक फसवणुकीच्या (Financial Fraud Case) गुन्ह्यात अशोक खरातला आज नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सुनावणीनंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) अशोक खरातविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
Ashok Kharat Case: वृद्धाश्रमासाठी भूखंड खरेदी केल्याचे प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, एका संबंधित व्यक्तीकडून अशोक खरातने वृद्धाश्रम उभारण्यासाठी भूखंड खरेदी केला होता. मात्र, या भूखंडाचा वृद्धाश्रमासाठी वापर झाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच प्रकरणातून आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल झाली आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरातविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
Ashok Kharat Case: पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर
या आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिसांनी अशोक खरातचा ताबा घेतला होता. त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. तपासाच्या दृष्टीने पोलिसांकडून पोलीस कोठडीचे हक्क राखून न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली होती. सुनावणीनंतर न्यायालयाने अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
Ashok Kharat Case: लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या प्रकरणांची सुनावणी 21 ऑक्टोबरला
दरम्यान, अशोक खरातविरोधात आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याबरोबरच लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाशी संबंधित प्रकरणेही न्यायप्रविष्ट आहेत. या प्रकरणांमधील पुढील सुनावणी 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे अशोक खरातविरोधातील विविध प्रकरणांमध्ये न्यायालयात पुढे काय घडते, याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
Ashok Kharat Case: अशोक खरातवर एकूण 17 गुन्हे
दरम्यान, लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या गंभीर आरोपांप्रकरणी मार्च महिन्यात अशोक खरातचे काळे कारनामे समोर येताच त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 12 गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला आहे. तसेच, मुंबईतील विशेष न्यायालयात अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ED) स्वतंत्र खटलाही सुरू आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
