Ashok Kharat Crime News: संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या नाशिकचा भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमले असले, तरी घटनेचे गांभीर्य पाहून महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी स्वतः या तपासाचा दैनंदिन आढावा घेत असल्याची माहिती समोर येत आहे.

Ashok Kharat Crime News: तक्रारीसाठी महिला सरसावल्या

सुरुवातीला काही व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अनेक महिला बदनामीच्या भीतीपोटी तक्रार करण्यासाठी पुढे येत नव्हत्या. मात्र, पोलिसांनी महिलांना विश्वासात घेऊन त्यांची ओळख गोपनीय ठेवण्याचे आश्वासन दिल्याने आता तक्रारींचा ओघ वाढला आहे. यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष हेल्पलाईनवर दिवसाला 5 ते 6 कॉल येत असून, गेल्या 23 दिवसांत शेकडो फोन आल्याची माहिती समोर आली आहे. तक्रार करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असून, फसवणूक आणि विश्वासघातासोबतच खरातकडून दबाव तंत्राचा वापर केल्याचेही समोर आले आहे.

Ashok Kharat Crime News: 15 गुन्हे दाखल, 40 जणांचे जबाब नोंदवले

अशोक खरातवर आतापर्यंत विविध कलमांखाली 15 गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी 8 गुन्हे महिलांवरील अत्याचाराशी संबंधित आहेत. हेल्पलाईनवर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत 40 जणांचे जबाब साक्षीदार म्हणून नोंदवले आहेत. यामुळे खरातभोवतीचा कायद्याचा फास अधिकच आवळला जाण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat Crime News: अंनिस मैदानात; राज्यभर 'बुवाबाजी' संमेलनाचे आयोजन

खरात प्रकरणानंतर 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती' (अंनिस) आक्रमक झाली आहे. श्याम मानव यांच्या नेतृत्वाखाली आज अकोला येथे 'बुवाबाजी संमेलन' आयोजित करण्यात आले असून, अशाच प्रकारची चर्चासत्रे संपूर्ण राज्यभर घेतली जाणार आहेत. खरातला कठोर शिक्षा व्हावी आणि जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी जनजागृती अभियान राबवणार असल्याचे महासचिव हरीश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Ashok Kharat Crime News: खरातची आज पुन्हा न्यायालयात हजेरी

महिला अत्याचार प्रकरणातील चौथ्या गुन्ह्याची पोलीस कोठडी आज संपत असल्याने खरातला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस आता पाचव्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी ईडी (ED) आणि SIT ने खरातच्या कार्यालयावर संयुक्त छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीत सरकारी पक्ष काय नवीन पुरावे सादर करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Ashok Kharat & Jitendra Shelke: अशोक खरात प्रकरणी साक्षीदार, शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष; अपघातात मृत्यू झालेले जितेंद्र शेळके कोण?