Ashok Kharat Case: महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे आरोप असलेला नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) या प्रकरणात उडी घेतली असून, खरातच्या बेकायदेशीर मालमत्तेवर टाच आणण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी दिवसभर चाललेल्या तपासणीनंतर, ईडीने खरातची 90 लाख रुपये किमतीची आलिशान मर्सिडीज कार जप्त (Seize) केली आहे.
Ashok Kharat Case: मृत्यूची भीती दाखवून लाटली मर्सिडीज
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही मर्सिडीज कार खरातने पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांची फसवणूक करून मिळवली होती. जासूद यांना त्यांच्या लॉजिस्टिक व्यवसायात यश हवे होते, त्यासाठी त्यांनी खरातशी संपर्क साधला होता. याचाच फायदा घेत खरातने त्यांना "मला परदेशात घेऊन चल" अशी मागणी केली. इतकेच नव्हे तर,"अवतार पूजा करण्यासाठी मर्सडीज कार घेऊन दे, अन्यथा तुझा मृत्यू होईल," अशी भीती घातली.
Ashok Kharat Case: 90 लाखांची कार
मरणाच्या भीतीने राजेंद्र जासूद यांनी 31 ऑगस्ट 2018 रोजी पुण्यातील शोरूममधून 90 लाख रुपयांची मर्सिडीज बुक केली. यासाठी 15 लाख रुपये डाऊन पेमेंट भरले आणि उर्वरित 75 लाख रुपयांचे कर्ज काढले. विशेष म्हणजे, गाडी पुण्यात बुक केली असली तरी तिचे पासिंग मुद्दाम नाशिक (MH 15) मधून करण्यात आले. खरातला अंकशास्त्राचे (Numerology) प्रचंड वेड असल्याने त्याने गाडीसाठी 8181 हा व्हीआयपी नंबर घेतला. या अंकांची बेरीज '9' होते, जो तो शुभ मानायचा. या नंबरसाठी जादा पैसेही मोजण्यात आले होते.
Ashok Kharat Case: इतर गाड्यांचेही '9' कनेक्शन
खरातच्या घराच्या आवारात उभ्या असलेल्या इतर गाड्यांवरही ईडीची नजर आहे. तेथे असलेल्या एका वाहनाचा नंबर (6453) याची बेरीजही (6+4+5+3 = 18, 1+8 = 9) नऊच येते. यावरून खरातने भोंदूगिरीच्या माध्यमातून कमावलेल्या पैशातून कशा प्रकारे लक्झरी जीवनशैली आणि अंधश्रद्धेचा बाजार मांडला होता, हे स्पष्ट होते. सोमवारी दिवसभर खरातच्या विविध मालमत्तांची तपासणी केल्यानंतर ईडीने मोठी कारवाई केली. खरातने आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे आणि या पैशांचा विनियोग कुठे केला आहे? याचा शोध आता घेतला जात आहे. बांधकाम व्यावसायिक जासूद यांच्याप्रमाणेच इतरही बड्या व्यक्ती खरातच्या जाळ्यात अडकल्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आणखी वाचा
